झुंजार सेनापती l मुंबई
मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रचाराला वेग आला असून उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मुंबई विमानतळ परिसरातील शिवसेनेच्या शाखांना भेटी दिल्या. यावेळी त्यांनी उमेदवार व कार्यकर्त्यांशी संवाद साधत मतदानाच्या दिवशी घ्यावयाच्या खबरदारीबाबत मार्गदर्शन केले.
यावेळी उद्धव ठाकरे यांनी महायुतीवर जोरदार हल्ला चढवत मुंबईकर मतदारांना थेट आवाहन केले. “पाकीट घेऊन आपले आयुष्य विकू नका. मुंबई आपली आहे आणि ती मराठी माणसांच्या ताब्यातच राहिली पाहिजे,” असे त्यांनी ठणकावून सांगितले.
ते पुढे म्हणाले, “आता जर चुकाल तर मुंबईला मुकाल. मागील निवडणुकीत आमच्या उमेदवाराचा निसटता पराभव झाला होता, मात्र यावेळी दणदणीत विजय निश्चित आहे,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा उल्लेख करत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली. “आपल्या दैवतांचे पुतळे झाकले जात आहेत. ही अस्मितेची लढाई आहे. मराठी भाषेवर आक्रमण होत असून मुंबईतील मराठी माणसाला बाजूला करण्याचा प्रयत्न सुरू आहे,” असे ठाकरे म्हणाले.
महापालिका निवडणूक ही केवळ सत्ता बदलाची नाही, तर मुंबईच्या भवितव्यासाठीची असल्याचे सांगत उद्धव ठाकरे यांनी मतदारांनी जागरूक राहून योग्य निर्णय घ्यावा, असे आवाहन केले.



