झुंजार सेनापती l पुणे
शहरातील महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणेकर मतदानासाठी सज्ज झाले असतानाच, मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी वाहतूक पोलिसांनी शहरातील प्रमुख मार्गांवर मोठे बदल जाहीर केले आहेत. आज सकाळपासून संध्याकाळपर्यंत अनेक ठिकाणी रस्ते बंद ठेवण्यात येणार असून, वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
वाहतूक पोलिसांच्या माहितीनुसार, मध्य पुणे, विमाननगर, हडपसर, कॅम्प, कोरेगाव पार्क या भागांत विशेष बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मतदान केंद्रांजवळील रस्त्यांवर खासगी वाहनांना प्रवेशबंदी लागू करण्यात आली आहे.
बंद राहणारे प्रमुख रस्ते
विमाननगर: फिनिक्स मॉल परिसरातील अंतर्गत रस्ते
मध्य पुणे: पुरम चौक–टिळक चौक, अलका टॉकीज–टिळक चौक मार्ग
हडपसर: शिवसेना चौक ते साने गुरुजी पथ
कॅम्प: पॉवर हाऊस चौक ते जुना मोटार स्टँड मार्ग
कोरेगाव पार्क: नॉर्थ मेन रोडचा काही भाग
➡️ पर्यायी मार्ग
विमाननगरकडे जाण्यासाठी नगर रोड व दत्त मंदिर चौक मार्ग
मध्य पुण्यात बाजीराव रोड, शास्त्री रोड
हडपसरसाठी गाडीतळ–डीपी रोड
कॅम्प परिसरात क्वॉर्टरगेट–सेव्हन लव्ह्स चौक
कोरेगाव पार्कसाठी कोरेगाव पार्क जंक्शन मार्ग
वाहतूक बदल सकाळी ६ ते संध्याकाळी ७ या वेळेत लागू राहणार आहेत. रुग्णवाहिका, अग्निशमन दल, पोलिस व निवडणूक कर्मचाऱ्यांच्या वाहनांना मात्र या बंदीतून सूट देण्यात आली आहे.
वाहतूक पोलिसांनी नागरिकांना घराबाहेर पडण्यापूर्वी मार्गांची माहिती घेण्याचे, तसेच शक्य असल्यास सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. मतदानाचा हक्क बजावताना नागरिकांनी सहकार्य करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.



