झुंजार सेनापती l पुणे
पुणे शहराचा कारभार पुढील पाच वर्षे कोणाच्या हाती जाणार, याचा कौल आज मतदार देणार आहेत. पुणे महानगरपालिकेच्या ४१ प्रभागांतील १६५ जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीत तब्बल १,१५३ उमेदवार मैदानात उतरल्याने शहरातील राजकीय वातावरण तापले आहे. ही निवडणूक केवळ नगरसेवकांची नसून, पुण्याच्या भविष्यातील विकासदिशा ठरवणारी निर्णायक लढाई ठरली आहे.
सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया चालणार असून प्रशासनाने कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. मात्र, प्रश्न असा आहे की मतदारांचा सहभाग किती असणार? गेल्या काही निवडणुकांमध्ये मतदानाची टक्केवारी घसरत असल्याचे चित्र आहे. शहराच्या विकासावर थेट परिणाम करणाऱ्या या निवडणुकीत पुणेकरांनी उदासीनता झटकून मतदानाचा हक्क बजावणे आवश्यक आहे.
राजकीय पक्षांनी प्रचारात मोठमोठी आश्वासने दिली, पण शहराला भेडसावणाऱ्या वाहतूक कोंडी, पाणीटंचाई, कचरा व्यवस्थापन, प्रदूषण आणि अनियोजित विकास यांसारख्या मूलभूत प्रश्नांवर ठोस उत्तर कितपत दिले, हा खरा मुद्दा आहे. अपक्ष उमेदवारांची संख्या वाढल्याने अनेक प्रभागांमध्ये मतांचे विभाजन होणार, हेही स्पष्ट आहे.
आजचा निकाल कोणत्याही एका पक्षाच्या बाजूने झुकला, तरी नव्या सत्ताधाऱ्यांसमोर जबाबदाऱ्यांचा डोंगर असणार आहे. निवडणूक जिंकणे हा केवळ पहिला टप्पा असून, पुणेकरांच्या विश्वासाला न्याय देणे ही खरी कसोटी असणार आहे. मतदारांचा कौल कोणाला मिळतो, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.



