झुंजार सेनापती l प्रतिनिधी
मुंबई, दि. १६ : महिलांचे आरोग्य केंद्रस्थानी ठेवत महाराष्ट्र राज्यात एक महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला असून, राज्यातील सर्व शासकीय रुग्णालये तसेच शहरी भागांमध्ये ‘मेनोपॉज क्लिनिक’ सुरू करण्यात आले आहेत, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी दिली.
राज्यमंत्री बोर्डीकर म्हणाल्या की, मेनोपॉज हा महिलांच्या आयुष्यातील अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाचा टप्पा आहे. या काळात महिलांना शारीरिक बदल, मानसिक ताण, हॉर्मोनल असंतुलन, हाडांचे आजार, झोपेचे विकार तसेच नैराश्याचा सामना करावा लागतो. मात्र आजवर या समस्यांकडे पुरेसे लक्ष दिले गेले नव्हते. हीच गरज ओळखून राज्य शासनाने महिलांसाठी स्वतंत्र मेनोपॉज क्लिनिक सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
या क्लिनिकच्या माध्यमातून महिलांना तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला, मानसिक आरोग्य समुपदेशन, हाडे, हृदय व हॉर्मोन तपासणी, आवश्यक औषधोपचार तसेच जीवनशैलीविषयक मार्गदर्शन एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
देशात प्रथमच अशा प्रकारचे ‘मेनोपॉज क्लिनिक’ सुरू करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले असून, महिलांच्या आरोग्यासाठी उचललेले हे पाऊल इतर राज्यांसाठीही मार्गदर्शक ठरणार असल्याचे राज्यमंत्री बोर्डीकर यांनी स्पष्ट केले.
मेनोपॉज हा आजार नसून महिलांच्या आयुष्यातील एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. मात्र या टप्प्यात महिलांना योग्य वैद्यकीय, मानसिक आणि सामाजिक आधाराची गरज असते. राज्यातील प्रत्येक महिलेला सन्मानपूर्वक उपचार आणि मार्गदर्शन मिळावे, यासाठीच ही योजना राबवण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले



