झुंजार सेनापती l मुंबई
मंत्रालय येथे अन्न व औषध प्रशासनमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या कार्यालयातील लिपिकाला लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आल्यानंतर तपासाला वेग आला आहे. या प्रकरणातील ठोस पुरावे गोळा करण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) सक्रिय झाली असून आज अधिकाऱ्यांनी मंत्रालयातील कंट्रोल रूममधून सीसीटीव्ही फुटेज जप्त केले.
तक्रारदार हरिराम घांची यांच्यासह एसीबीचे पाच ते सहा अधिकारी मंत्रालयातील कंट्रोल रूममध्ये दाखल झाले. फुटेजची तपासणी करत असतानाच घांची यांचा सविस्तर जबाब नोंदवण्यात आला. लिपिक राजेंद्र ढेरंगे याचा लाच मागतानाचा व्हिडिओ यापूर्वी व्हायरल झाला होता. त्या वेळी कार्यालयात नेमके कोण-कोण उपस्थित होते, याची माहिती सीसीटीव्हीच्या आधारे गोळा करण्यात आली.
दरम्यान, ढेरंगे याचा मोबाईल फोनही जप्त करण्यात आला असून त्यातील डेटा तपासण्यासाठी तांत्रिक विश्लेषण सुरू आहे. कॉल रेकॉर्ड, संदेश व अन्य डिजिटल पुरावे तपासले जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
ढेरंगेला जामीन
दरम्यान, मुंबई सत्र न्यायालयातील एसीबीच्या विशेष न्यायालयाने राजेंद्र ढेरंगे याला जामीन मंजूर केला. न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर त्याच्या जामिनावर सुनावणी घेण्यात आली आणि काही अटींसह त्याला दिलासा देण्यात आला.
ढेरंगे हा मूळचा अन्न व नागरी पुरवठा विभागातील कर्मचारी असून, गेल्या वर्षीच तो अन्न व औषध प्रशासन विभागात प्रतिनियुक्तीवर आला होता. मंत्र्यांच्या अपील विभागात तो कार्यरत असल्याची माहिती आहे. प्रकरणी पुढील तपास सुरू असून एसीबीकडून अधिक पुरावे गोळा करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.



