झुंजार सेनापती l मुंबई
राज्याच्या विधान परिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून, ९ जागांसाठी येत्या १२ मे रोजी मतदान होणार आहे. विद्यमान सदस्यांचा कार्यकाळ १३ मे रोजी संपणार असल्याने या निवडणुकीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
राज्यातील सध्याच्या संख्याबळाचा विचार करता राजकीय समीकरण स्पष्ट दिसत आहे. त्यानुसार भाजपला ५ जागा, शिंदेंच्या शिवसेनेला २ जागा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला १ जागा आणि महाविकास आघाडीतील इतर घटकांना १ जागा मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. जागांच्या तुलनेत उमेदवारांची संख्या मर्यादित राहिल्यास ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे; मात्र अधिक उमेदवार रिंगणात उतरल्यास चुरशीची लढत होऊ शकते.
दरम्यान, या पार्श्वभूमीवर जयमल्हार सेवा संघाने डॉ. मुरहरी केळे यांना विधान परिषदेसाठी संधी देण्याची मागणी केली आहे. उर्जा क्षेत्रात तसेच साहित्यिक क्षेत्रात डॉ. केळे यांचे मोठे योगदान असल्याचे संघटनेने नमूद केले आहे.
डॉ. मुरहरी केळे यांनी त्रिपुरा राज्यात महाव्यवस्थापक म्हणून काम पाहिले असून, महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनीचे संचालक म्हणूनही त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यांच्या प्रशासकीय अनुभवासोबतच समाजाभिमुख कार्याचा विचार करून त्यांना विधान परिषदेवर संधी द्यावी, अशी मागणी जयमल्हार सेवा संघाकडून करण्यात आली आहे.
या मागणीमुळे विधान परिषद निवडणुकीत उमेदवारीसंदर्भातील चर्चांना अधिक वेग आला असून, विविध राजकीय पक्ष कोणाला संधी देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



