spot_img
spot_img

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशांना धाब्यावर बसवून अवैध पाणी उपसा सुरू; बीड जिल्हा दुष्काळाच्या उंबरठ्यावर

“पथक निष्क्रिय असल्याचा डॉ. गणेश ढवळे यांचा आरोप

झुंजार सेनापती l  बीड

पाटोदा तालुक्यातील भायाळा साठवण तलावातून सुरू असलेल्या अवैध पाणी उपश्यामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून, जिल्हाधिकाऱ्यांच्या स्पष्ट आदेशानंतरही संबंधित यंत्रणा निष्क्रिय असल्याचे समोर आले आहे.
जिल्हाधिकारी विवेक जान्सन यांनी पिण्याच्या पाण्याचे नियोजन कोलमडू नये यासाठी जिल्ह्यातील लघु व मध्यम प्रकल्पांमधून होणारा नियमबाह्य पाणी उपसा तत्काळ थांबवण्याचे आदेश महसूल व पाटबंधारे विभागाला दिले होते. मात्र, या आदेशांची अंमलबजावणी होत नसल्याने प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
दरम्यान, भायाळा तलावावर अवलंबून असलेल्या भायाळा, वाघिरा, मेंगडेवाडी, लिंबागणेश, पोखरी (घाट), पिंपरनई, बेलगाव (सोमनाथवाडी) आदी गावांमध्ये पाणीटंचाईचे सावट गडद होत चालले आहे. शेतातील विहिरी, सार्वजनिक पाणीपुरवठा योजना आणि विंधन विहिरी कोरड्या पडण्याच्या मार्गावर आहेत.
“कागदी घोडे नाचवण्यात प्रशासन मग्न” असुन 
अवैध पाणी उपसा रोखण्यासाठी नेमण्यात आलेले पथक निष्क्रिय असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे (लिंबागणेशकर) यांनी केला आहे. प्रशासन केवळ कागदोपत्री कारवाई करत असून प्रत्यक्षात कोणतीही ठोस उपाययोजना होत नसल्याची टीका त्यांनी केली आहे.
तलावातील पाणी साठा संरक्षित ठेवण्याची मागणी
शासनाच्या नियमानुसार तलावातील ६७ टक्के पाणीच सिंचनासाठी वापरण्याची परवानगी असून उर्वरित ३३ टक्के पाणी मानव, जनावरे व वन्यजीवांसाठी राखीव ठेवणे बंधनकारक आहे. मात्र, या नियमांचे उल्लंघन होत असल्याने भविष्यात गंभीर पाणीबाणी निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे.
डॉ. ढवळे यांनी तलावातील पाणीसाठा संरक्षित ठेवावा तसेच कामचुकार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
जिल्ह्यात पाणीसाठा झपाट्याने घटतोय
वाढत्या तापमानामुळे बाष्पीभवनाचा वेग वाढला असून जिल्ह्यातील पाणीसाठा झपाट्याने कमी होत आहे. जिल्ह्यातील १६ मध्यम प्रकल्पांपैकी ३ प्रकल्पांमध्ये २५ टक्क्यांपेक्षा कमी पाणी शिल्लक आहे. तसेच १२६ लघु प्रकल्पांपैकी १२ प्रकल्प जोत्याखाली गेले असून २१ प्रकल्पांमध्ये ५० टक्केच पाणी आहे.
शासनाच्या अहवालानुसार, जिल्ह्यातील १४३ धरणांमध्ये सध्या १९८.७१२ दशलक्ष घनमीटर पाणी मृतसाठ्यात आहे, तर ३० धरणांमध्ये १० टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा शिल्लक आहे.

Related Articles

जनादेश, विचारधारा आणि सत्तेची भूक

⬤ झुंजार सेनापती l प्रतिनिधी  महाराष्ट्राच्या २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत मतदारांनी स्पष्टपणे भाजप-शिवसेना युतीला बहुमताचा कौल दिला होता. निवडणुकीपूर्वी दोन्ही पक्षांनी एकत्र लढत जनतेकडे मतांची...

बेस्ट वाचवण्यासाठी कामगारांचा एल्गार; शुक्रवारपासून बेमुदत संपाचा इशारा

⬤ झुंजार सेनापती l मुंबई मुंबईकरांची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या बेस्ट उपक्रमाच्या कथित खासगीकरणाविरोधात आणि अदानी समूहाला लाभ मिळवून देण्याच्या प्रयत्नांविरोधात बेस्ट कामगारांनी संघर्षाची भूमिका घेतली...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!