spot_img
spot_img

अंजनवती खून प्रकरणाचा नेकनूर पोलिसांनी तीन दिवसांत लावला छडा

रुजु होताच ठाणेदार मंगेश साळवे यांनी उमटवला कौशल्याचा ठसा

झुंजार सेनापती l बीड

तालुक्यातील लिंबागणेश-अंजनवती मार्गावर दुचाकीखाली दबलेल्या अवस्थेत आढळलेल्या २७ वर्षीय तरुणाच्या मृत्यूमागील धक्कादायक सत्य अखेर समोर आले आहे. प्रथमदर्शनी अपघात वाटणारे हे प्रकरण प्रत्यक्षात खुनाचे असल्याचे उघड झाले असून, मृत तरुणाच्या दोन मित्रांनीच त्याचा गळा आवळून खून केल्याची कबुली दिली आहे. कोणताही ठोस सुगावा नसताना अवघ्या तीन दिवसांत या गुंतागुंतीच्या प्रकरणाचा छडा लावून नेकनूर पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे.मृत तरुणाचे नाव किरण बट्टू सोनवणे (वय २७, रा. अंजनवती) असे असून, आरोपी दशरथ परदेशी (वय २५) व धीरज येडे (वय २६, दोघे रा. अंजनवती) यांना पनवेल येथून अटक करण्यात आली आहे.किरण सोनवणे हा ३ मे रोजी आपल्या दुचाकीवरून घराबाहेर पडला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याचा मृतदेह दुचाकीखाली दबलेल्या अवस्थेत रस्त्याच्या कडेला आढळून आला. सुरुवातीला हा अपघाती मृत्यू असल्याचे वाटत होते. मात्र पंचनामा करताना पोलिसांच्या निदर्शनास त्याच्या गळ्यावर संशयास्पद काळसर व्रण आढळले. त्यानंतर शवविच्छेदन अहवालात गळा आवळून खून झाल्याचे स्पष्ट झाले. यानंतर नेकनूर पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.प्रभारी अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक मंगेश साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची चक्रे वेगाने फिरवण्यात आली. कोणताही प्रत्यक्ष पुरावा नसताना पोलिसांनी तांत्रिक तपास, स्थानिक माहिती आणि मानवी गुप्त माहितीच्या आधारे तब्बल शंभरहून अधिक व्यक्तींची चौकशी केली.आरोपींनी संशय टाळण्यासाठी स्वतःचे मोबाइल फोन घरीच ठेवले होते. त्यामुळे तपासात मोठे आव्हान निर्माण झाले होते. मात्र पोलिसांनी हार न मानता विविध तांत्रिक बाबींचे विश्लेषण करत आरोपींचा माग काढला.तपासादरम्यान आरोपी पनवेल परिसरात पळून गेल्याची माहिती मिळाली. त्यानंतर तातडीने तळोजा पोलिस ठाण्यातील “पोलिस मित्र” म्हणून ओळखले जाणारे सहाय्यक पोलिस निरीक्षक निलेश येवले यांच्याशी संपर्क साधण्यात आला. त्यांच्या पथकाने पनवेल परिसरात सापळा रचून दोन्ही आरोपींना एका हॉटेलमधून ताब्यात घेण्यात आले. त्यांना नेकनूर येथे आणून न्यायालयात हजर करण्यात आले.पोलिसी चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. घटनेच्या दिवशी किरण सोनवणे आणि आरोपी यांच्यात जोरदार वाद झाला होता. वादादरम्यान किरणने आरोपींना शिवीगाळ केल्याचा राग त्यांच्या मनात होता. याच कारणातून संतापलेल्या आरोपींनी किरणचा गळा आवळून खून केला. त्यानंतर हा प्रकार अपघात असल्याचा बनाव करण्यासाठी मृतदेह आणि दुचाकी रस्त्याच्या कडेला टाकून तेथून पलायन केले.नेकनूर पोलिस ठाण्यात गेल्याच आठवड्यात सहायक पोलिस निरीक्षक म्हणून रुजू झालेल्या मंगेश साळवे यांनी आपल्या कार्यक्षमतेची चुणूक दाखवत खून प्रकरणाचा अवघ्या तीन दिवसांत छडा लावला. कोणताही ठोस पुरावा अथवा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसताना केवळ तांत्रिक तपास, गोपनीय माहिती आणि तपासातील बारकावे यांचा प्रभावी वापर करून दोन आरोपींना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले. नुकताच पदभार स्वीकारलेल्या अधिकाऱ्याने इतक्या कमी कालावधीत अत्यंत गुंतागुंतीच्या गुन्ह्याचा उलगडा केल्याने पोलिस दलासह नागरिकांमधूनही त्यांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे.या गुन्ह्याचा छडा लावण्यात सहायक पोलिस निरीक्षक मंगेश साळवे यांच्यासह पोलिस कर्मचारी संजय गुंड, दत्ता बळवंत, विशाल क्षीरसागर, मन्सूर शेख तसेच तांत्रिक शाखेचे विकी सुखसे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक शिवाजी बंटेवाड, उपनिरीक्षक सुशांत सुतळे आणि त्यांच्या पथकानेही तपासात मोलाचे सहकार्य केले.

Related Articles

Hoe je slimmer kunt spelen en winnen bij Vegas Hero Casino online

In dit artikel bespreken we praktische strategieën en tips om slimmer te spelen en je kansen op winst te vergroten bij het Vegas Hero...

मत्स्यव्यवसाय विभागाच्या योजना अधिकाधिक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवा!

झुंजार सेनापती l मुंबई मत्स्यव्यवसाय विभागाचा निधी प्रभावीपणे खर्च होण्यासाठी विविध नाविन्यपूर्ण योजनांच्या माध्यमातून अधिकाधिक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावे. मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेवर विशेष भर देऊन लाभार्थ्यांची संख्या...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!