⬤ झुंजार सेनापती l मुंबई
छत्रपती संभाजीनगर, जालना आणि मालेगाव येथे बनावट कागदपत्रांच्या आधारे दस्त नोंदणी व जमीन व्यवहार करणाऱ्या रॅकेटविरोधात राज्य सरकारने कठोर भूमिका घेतली आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पोलीस व मुद्रांक विभागाला संयुक्त टास्क फोर्स स्थापन करून पुढील मंगळवारपर्यंत कारवाईचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.
या प्रकरणात बनावट खरेदीखते, खोटी वारस प्रमाणपत्रे, दस्तांमध्ये फेरफार करून जमीन व्यवहार केल्याचे प्रकार उघडकीस आले असून आतापर्यंत १६ गुन्हे दाखल झाले आहेत. या मागील संपूर्ण साखळीचा शोध घेऊन सूत्रधारांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून बनावट कागदपत्रे तयार करणाऱ्या तसेच शासनाची फसवणूक करणाऱ्यांवर मोका व तडीपारीसारख्या कडक कारवाया करण्याचे संकेत देण्यात आले आहेत.
दरम्यान, मंत्री अतुल सावे यांनी संबंधितांवर अजामिनपात्र गुन्हे दाखल करून तपासाची व्याप्ती वाढविण्याची मागणी केली असून आणखी अनेक प्रकरणे उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त केली आहे. :::



