⬤ झुंजार सेनापती l मुंबई
राज्यातील ३०४ तालुक्यांत दुष्काळ जाहीर झाल्याच्या पार्श्वभूमीवर पशुधनासाठी संभाव्य चारा टंचाई रोखण्यासाठी राज्य शासनाने चारा खरेदीचे सुधारित आधारभूत दर निश्चित केले आहेत. सुका चारा प्रतिकिलो कमाल १२ रुपये, तर मुरघास प्रतिकिलो कमाल ८ रुपये दराने खरेदी करण्यात येणार आहे. यामुळे दुष्काळी परिस्थितीत पशुपालकांना दिलासा मिळणार असल्याची माहिती पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली.
महसूलमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ उपसमितीने स्थापन केलेल्या अभ्यासगटाने राज्यातील तसेच इतर राज्यांतील चारा व्यवस्थापनाचा अभ्यास करून अहवाल सादर केला. या अहवालाला २७ ऑक्टोबर रोजी झालेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
हे सुधारित दर मदत व पुनर्वसन विभागाने जाहीर केलेल्या दुष्काळी कालावधीत लागू राहणार आहेत. जिल्हास्तरीय दुष्काळ व्यवस्थापन कार्यकारी समितीमार्फत चारा खरेदीची कार्यवाही करण्यात येईल. मात्र, निश्चित केलेल्या दरांमध्ये वाहतूक खर्चाचा समावेश नसून तो स्वतंत्रपणे लागू राहणार आहे.
चाऱ्याच्या गुणवत्तेवरही शासनाचे लक्ष
खरेदी करण्यात येणाऱ्या सुक्या चाऱ्यातील ओलावा १५ टक्क्यांपेक्षा अधिक नसावा. चारा बुरशीमुक्त, कीड व मातीविरहित आणि दुर्गंधी नसलेला असणे आवश्यक आहे. ज्वारी व बाजरीच्या चाऱ्याला प्राधान्य दिले जाणार आहे.
मुरघास हवाबंद व बुरशीमुक्त असणे बंधनकारक असून त्यातील ओलावा ६२ ते ७० टक्के, सामू ३.५ ते ४.४ आणि कच्चे प्रथिन किमान ७ टक्के असणे आवश्यक आहे. अन्य गुणवत्तेसाठी भारतीय मानक ब्युरोचे निकष लागू राहतील.
दुष्काळाच्या काळात पशुधनाचे संगोपन आणि सुरक्षित चारा उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी शासनाने ही उपाययोजना आखली आहे.



