⬤ झुंजार सेनापती l मुंबई
नागपूर, दि. ८ : राज्यातील दुष्काळी परिस्थिती आणि निर्माण झालेल्या जलसंकटाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केला आहे. विशेष बाब म्हणून झाडे जगविण्यासाठी आवश्यक असलेल्या ठिकाणी केवळ शेतीकामाकरिता विंधन विहिरी खोदण्यावरील बंदी येत्या १५ डिसेंबरपर्यंत उठविण्यात येत असल्याची घोषणा त्यांनी केली. मात्र, यासाठी शेतकऱ्यांना संबंधित यंत्रणेची परवानगी घेणे बंधनकारक राहणार असून, हा निर्णय सरसकट लागू नसेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यातील लोहारी सावंगा येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध ग्रामपंचायतींच्या सरपंच आणि लोकप्रतिनिधींशी संवाद साधला. शनिवारी याच गावात मुक्काम करून शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी केल्यानंतर रविवारी सकाळी पुढील दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी त्यांनी ग्रामप्रतिनिधींच्या समस्या जाणून घेतल्या.
यंदा दुष्काळामुळे गंभीर जलसंकट निर्माण झाले असून, शेतातील पिके हातची जाण्याची भीती लोकप्रतिनिधींनी व्यक्त केली. त्यावर मुख्यमंत्री म्हणाले की, विंधन विहिरींचे खोलीकरण तसेच नवीन विंधन विहिरी करण्यावरील बंदी उठविणे शासनासाठी काहीसे अडचणीचे असले, तरी विशेष परिस्थिती लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात येत आहे. झाडे जगविण्यासाठी जिथे आवश्यकता आहे, तिथेच परवानगी दिली जाईल. नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा आणि पावसाच्या पाण्याचे पुनर्भरण करण्यावर भर द्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
पशुधनासाठी दवाखाने उभारण्याचे निर्देश
या परिसरात मोठ्या प्रमाणात पशुधन असतानाही पुरेशा पशुदवाखान्यांची सुविधा उपलब्ध नसल्याची व्यथा लोकप्रतिनिधींनी मांडली. याची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पशुदवाखान्यांची पाहणी करून तातडीने निर्णय घेण्याचे निर्देश दिले.
जलजीवन मिशनची अपूर्ण कामे पूर्ण करणार
जलजीवन मिशनअंतर्गत निधीअभावी काही कामे अपूर्ण राहिल्याचे मुख्यमंत्र्यांनी मान्य केले. ज्या ठिकाणी ७५ टक्क्यांपेक्षा अधिक कामे पूर्ण झाली आहेत, तेथे तातडीने निधी उपलब्ध करून उर्वरित कामे पूर्ण केली जातील. अन्य ठिकाणची कामेही टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्यात येतील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
वन्यप्राण्यांपासून पिकांच्या संरक्षणासाठी तार कुंपण योजना विस्तारणार
वन्यप्राण्यांकडून शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचा मुद्दाही यावेळी उपस्थित करण्यात आला. यावर उपाय म्हणून तार कुंपण योजना अधिक व्यापक करण्यात येणार असून, जंगलालगत असलेल्या शेतांना या योजनेत विशेष प्राधान्य दिले जाईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.


