spot_img

दुष्काळात रोजगाराची मागणी करणाऱ्या प्रत्येक पात्र कुटुंबाला काम द्या!

- भरत गोगावले

⬤ झुंजार सेनापती l मुंबई

राज्यातील दुष्काळी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन रोजगार हमी योजना आणि ‘व्हीबी जी राम जी’ अंतर्गत रोजगारनिर्मितीची कामे सर्व स्तरांवर प्रभावीपणे राबवावीत. ग्रामीण भागात रोजगाराची मागणी करणारे एकही पात्र कुटुंब रोजगारापासून वंचित राहता कामा नये. रोजगारनिर्मितीसोबतच जलसंधारण, चारा उपलब्धता आणि ग्रामीण पायाभूत सुविधांच्या निर्मितीला प्राधान्य द्यावे, असे स्पष्ट निर्देश रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी दिले.
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर ‘व्हीबी जी राम जी’ अंतर्गत घ्यावयाची कामे आणि प्रलंबित देयकांचा आढावा मंत्री गोगावले यांनी दूरदृश्यसंवादाद्वारे आयोजित बैठकीत घेतला. दुष्काळी परिस्थितीत ग्रामीण जनतेला दिलासा देणे, शेतकऱ्यांना आधार देणे आणि प्रत्येक गरजू कुटुंबाला रोजगार उपलब्ध करून देणे हे विभागाचे सर्वोच्च प्राधान्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या कामांबाबत कोणत्याही स्तरावरील अधिकाऱ्याने जबाबदारी टाळू नये, असेही त्यांनी बजावले.
राज्य शासनाने ११६ कोटी रुपयांचा पूरक कुशल निधी उपलब्ध करून दिला आहे. या निधीचा वापर केवळ शासनमान्य आणि निधी वितरण पत्रात नमूद केलेल्या कामांसाठीच करावा. पाणंद रस्त्यांच्या ज्या कामांना पूरक कुशल निधीची मान्यता देण्यात आली आहे, त्यांचीच देयके अदा करावीत. निधीच्या वापरात अनियमितता किंवा दिरंगाई आढळल्यास ती खपवून घेतली जाणार नाही, असा इशाराही मंत्री गोगावले यांनी दिला.राज्यातील चाऱ्याची सर्वाधिक टंचाई असलेल्या जिल्ह्यांचे तातडीने मूल्यांकन करून प्राधान्यक्रमानुसार यादी तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. कोकणात उपलब्ध असलेल्या गवताची कापणी सुरू करण्यात आली असून, नव्याने चारा उपलब्ध होईपर्यंत टंचाईग्रस्त जिल्ह्यांना कोकणातून शक्य तितका चारा पाठविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यामुळे दुष्काळी भागातील पशुधनासाठी चारा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल उचलण्यात येत आहे.

७६ कोटींच्या निधी वितरणाला गती

‘व्हीबी जी राम जी’ अंतर्गत ७६ कोटी रुपयांचे निधी हस्तांतरण आदेश प्राप्त झाले आहेत. त्यापैकी ३८ कोटी रुपयांच्या निधी वितरणाची प्रक्रिया पूर्ण झाली असून, संबंधित लाभार्थी आणि अंमलबजावणी यंत्रणा असलेल्या ग्रामपंचायतींच्या खात्यांत ही रक्कम वर्ग करण्यात आली आहे. उर्वरित ३८ कोटी रुपयांचे प्रमाणीकरण पूर्ण करून येत्या शुक्रवारपर्यंत निधी वितरित करण्याची कार्यवाही करावी, असे निर्देशही मंत्री गोगावले यांनी विभागाला दिले.
दुष्काळाच्या संकटात ग्रामीण भागातील कुटुंबांना रोजगार, शेतकऱ्यांना आधार आणि पशुधनाला चारा उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने यंत्रणेला कामाला लावले असून, योजनांच्या अंमलबजावणीत कोणतीही कुचराई होऊ नये, असा स्पष्ट संदेश या बैठकीतून देण्यात आला.

Related Articles

मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेच्या १,२४० कोटींचा लाभ मच्छिमारांपर्यंत पोहोचवा!

⬤ झुंजार सेनापती l मुंबई मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत समाविष्ट असलेल्या जिल्हास्तरीय २२ योजनांची प्रभावी आणि प्राधान्याने अंमलबजावणी करण्यासाठी शासनाने प्रशासकीय हालचालींना वेग दिला आहे....

महाराष्ट्रात ११ अभ्यासक्रमांसाठी आता दोन वेळा सीईटी!

⬤ झुंजार सेनापती l मुंबई महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) शैक्षणिक वर्ष २०२७-२८ साठी पदवी आणि पदव्युत्तर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षांचे संभाव्य...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!