spot_img

मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेच्या १,२४० कोटींचा लाभ मच्छिमारांपर्यंत पोहोचवा!

मंत्री नितेश राणे

⬤ झुंजार सेनापती l मुंबई
मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत समाविष्ट असलेल्या जिल्हास्तरीय २२ योजनांची प्रभावी आणि प्राधान्याने अंमलबजावणी करण्यासाठी शासनाने प्रशासकीय हालचालींना वेग दिला आहे. या योजनांसाठी मंजूर करण्यात आलेल्या १ हजार २४० कोटी रुपयांच्या निधीचा प्रभावी विनियोग करून राज्यातील मच्छिमार बांधवांना प्रत्यक्ष लाभ मिळवून द्यावा, असे निर्देश मंत्रालयात आयोजित आढावा बैठकीत मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिले

मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांसमवेत मंत्रालयात बैठक घेण्यात आली. महाडीबीटी प्रणालीमध्ये मत्स्यव्यवसाय विभागाचा समावेश करण्यात आला असून, या माध्यमातून योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हा मत्स्यव्यवसाय विभागाचे अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा नियोजन अधिकारी यांनी परस्पर समन्वयाने काम करावे. योजनांची माहिती राज्यातील प्रत्येक मच्छिमार आणि पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत, असे निर्देश बैठकीत देण्यात आले.
प्रत्येक पात्र लाभार्थ्याला योजनांचा लाभ मिळणे आवश्यक असून, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाचे सहकार्य आणि सक्रिय सहभाग महत्त्वाचा आहे. मंजूर निधीचा योग्य विनियोग करून योजनांची अंमलबजावणी वेळेत पूर्ण करण्यावर प्रशासनाने भर द्यावा, असेही स्पष्ट करण्यात आले.
या बैठकीस पदुम विभागाचे सचिव रामास्वामी एन., मत्स्यव्यवसाय आयुक्त भानुदास पालवे, मत्स्योद्योग महामंडळाचे अध्यक्ष प्रकाश खपले यांच्यासह दूरदृश्यसंवाद प्रणालीद्वारे राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, त्यांचे प्रतिनिधी आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.
राज्यातील मत्स्यव्यवसायाला चालना देण्याबरोबरच मच्छिमारांचे आर्थिक सक्षमीकरण करण्यासाठी १,२४० कोटींच्या निधीतून राबविण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविणे हे प्रशासनासमोरील महत्त्वाचे उद्दिष्ट ठरणार आहे.

Related Articles

दुष्काळात रोजगाराची मागणी करणाऱ्या प्रत्येक पात्र कुटुंबाला काम द्या!

⬤ झुंजार सेनापती l मुंबई राज्यातील दुष्काळी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन रोजगार हमी योजना आणि ‘व्हीबी जी राम जी’ अंतर्गत रोजगारनिर्मितीची कामे सर्व स्तरांवर...

महाराष्ट्रात ११ अभ्यासक्रमांसाठी आता दोन वेळा सीईटी!

⬤ झुंजार सेनापती l मुंबई महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) शैक्षणिक वर्ष २०२७-२८ साठी पदवी आणि पदव्युत्तर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षांचे संभाव्य...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!