झुंजार सेनापती l मुंबई
राज्य शासनाने १ एप्रिल २०१९ पूर्वी उत्पादित झालेल्या जुन्या नोंदणीकृत वाहनांना ‘हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट’ (उच्च सुरक्षित नोंदणी क्रमांक पाटी) बसविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मुंबई मध्य प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील सर्व वाहनधारकांनी त्यांच्या वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे. केंद्रीय मोटार वाहन नियम, १९८९ आणि केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्रालयाच्या नियमानुसार १ एप्रिल २०१९ पासून उत्पादित होणाऱ्या सर्व नवीन वाहनांना ही नंबर प्लेट बसवण्याची तरतूद आहे. यामुळे वाहनांच्या नंबर प्लेटमध्ये छेडछाड व बनावटगिरी करुन होणारे गुन्हे कमी करणे, रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांची ओळख पटविणे शक्य होणार आहे.