झुंजार सेनापती l बीड (प्रतिनिधी)
मस्साजोग तालुका केज येथील नदी खोलीकरणाच्या कामाने वेग घेतला आहे. नाम फाउंडेशन मार्फत हे काम चालू आहे. गेल्या काही दिवसात चांगल्या पद्धतीने काम होत आहे. या कामाची पाहणी जन आंदोलनाचे विश्वस्त ॲड. अजित देशमुख आणि नामचे समन्वयक राजाभाऊ शेळके यांनी केली.
नदी खोलीकरणाचा हा प्रकल्प योग्य वेळेत सुरू झाल्यामुळे पावसाळ्यापूर्वी खूप मोठे काम करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. शेतकऱ्यांनी देखील या कामाकडे लक्ष वेधले आहे. त्यामुळे कामाने चांगली गती घेतली असून कामाकडे लक्ष देण्यासाठी सक्षम कार्यकर्त्याची नियुक्ती देखील करण्यात आली आहे.
रविवारी या कामाची पाहणी करण्यासाठी ॲड. अजित देशमुख यांच्यासह राजाभाऊ शेळके, भागवत कदम, तुषार देशमुख, मंगेश देशमुख, मनोज देशमुख, बाळासाहेब देशमुख यांच्यासह अन्य शेतकऱ्यांनी भाग घेतला. चांगल्या पद्धतीने काम होत असल्याने सर्वांनी समाधान व्यक्त केले. यानंतर धनंजय देशमुख यांच्या बरोबरही चर्चा करण्यात आली.
या नदीतील गाळ निघतो तेवढा काढल्यानंतर मोठे खड्डे होतील आणि त्यात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा होईल. त्यातून गाव विकासाला चालना मिळेल त्यामुळे शेतकऱ्यांसह सर्व गावकऱ्यांनी या कामाकडे लक्ष द्यावे, असे आवाहन देखील शेळके आणि ॲड. देशमुख यांनी केले आहे.



