झुंजार सेनापती l सोमनाथ पाटील
महापालिकेने उभारलेल्या क्रिकेट प्रशिक्षण केंद्राची व्यवस्था पाहिल्यावर छातीठोकपणे सांगू शकतो की, ही सर्व व्यवस्था एक नंबर आहे. या प्रशिक्षण केंद्रासाठी महापालिकेने दिलीप वेंगसरकर यांची अगदी अचूक निवड केली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली इथे गुणवत्ताधारक खेळाडू निश्चितच घडतील. तसेच पालिकेच्या प्रयत्नांमुळे या खेळाडूंना चांगल्या संधी नक्की मिळतील, असा विश्वास राज्याचे माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी व्यक्त केला.
पनवेल महानगरपालिकेच्या नवीन पनवेल येथील नवनिर्मित आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रिकेट प्रशिक्षण केंद्राचे भव्य उद्घाटन आज रविवार, २७ एप्रिल २०२५ रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले. यावेळी ते बोलत होते. या वेळी भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार पद्मश्री दिलीप वेंगसरकर, खासदार श्रीरंग बारणे, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, आमदार विक्रांत पाटील, सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक गणेश देशमुख, पनवेल महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक मंगेश चितळे, अतिरिक्त आयुक्त गणेश शेटे, रायगड क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अनिरुद्ध पाटील, माजी महापौर कविता चौतमोल, सिडकोचे माजी अध्यक्ष बाळासाहेब पाटील, माजी सभागृहनेते परेश ठाकूर, माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे व मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना खासदार श्रीरंग बारणे यांनी सांगितले की, दिलीप वेंगसरकर सारख्या जाणकार क्रिकेटपटूंकडून प्रशिक्षण घेऊन या अकादमीतून उत्तम खेळाडू घडतील. त्यांची अशा प्रकारची अकादमी चालवण्याची हातोटी नक्कीच उदयन्मुख खेळाडूसाठी उपयुक्त आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पनवेलचे खेळाडू भारतीय संघात दिसतील – पद्मश्री वेंगसरकर
यावेळी पद्मश्री दिलीप वेंगसरकर म्हणाले, पनवेल कार्यक्षेत्रात क्रिकेट खेळाडूंमध्ये मोठ्या प्रमाणात टॅलेंट दिसून येते. या क्रिकेट प्रशिक्षण केंद्रामुळे त्यांना मोठे व्यासपीठ मिळेल आणि इथले खेळाडू भविष्यात भारतीय क्रिकेट संघातून खेळताना दिसतील.
आमदार प्रशांत ठाकूर यांनी आपल्या भाषणात सांगितले की, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधांनी सुसज्ज असलेल्या या क्रिकेट प्रशिक्षण केंद्रामुळे पनवेल आणि परिसरातील नवोदित क्रिकेटपटूंना दर्जेदार प्रशिक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. श्री. वेंगसरकर यांच्या मार्गदर्शनाखाली या भागातील क्रिकेटपटूंना उत्कृष्ट दर्जाची कामगिरी करण्याची संधी मिळणार आहे.
विधान परिषदेचे आमदार विक्रांत पाटील म्हणाले की, शहराचा जिवंतपणा टिकवून ठेवण्यासाठी शहराची कला, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात समांतर वाढ होणे आवश्यक असते. महापालिकेच्या आयुक्तांनी व सर्व अधिकारी वर्गाने शहराचा हा जिवंतपणा टिकवून ठेवण्यासाठी विविध विकासकामांबरोबरच या क्रिकेट अकादमीतून चांगले कार्य केले आहे.
सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक गणेश देशमुख यांनी सांगितले की, या भागाला क्रिकेटचा मोठा वारसा आहे. महापालिकेने उभारलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या प्रशिक्षण अकादमीमुळे पनवेलच्या नावलौकिकात भर पडली आहे. भविष्यात भारतीय संघामध्ये या प्रशिक्षण केंद्रातील मुले खेळताना दिसली तर खऱ्या अर्थाने या उपक्रमाची पूर्तता होईल.
पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी सांगितले की, तरुण पिढीमध्ये नवभारत घडवण्याची ऊर्जा आहे. याच संकल्पनेतून हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट प्रशिक्षण केंद्र साकारले आहे. या केंद्रातून मुलांचे भविष्य घडेल. तसेच पनवेल महानगरपालिका हद्दीतील विविध विभागांमध्ये टेनिस कोर्ट, कबड्डी, कुस्ती, क्रिकेट व इतर खेळांचे क्रीडांगण उभारण्याच्या दृष्टीने पावले उचलली जात आहेत.आपल्या प्रास्ताविकातून आयुक्त व प्रशासक मंगेश चितळे यांनी सांगितले की, हे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण केंद्र साडेसात एकर क्षेत्रावर साकारले असून यासाठी १४ कोटी ५५ लाख रुपये खर्च झाले आहेत. १५० मीटर व्यासाचे क्रिकेट मैदान, पॅव्हेलियन इमारत आणि इतर आवश्यक सुविधा येथे उभारण्यात आल्या आहेत. दरवर्षी १० ते १९ वयोगटातील १०१ विद्यार्थ्यांना विनामूल्य प्रशिक्षण दिले जाणार आहे. यामध्ये पनवेल महानगरपालिका हद्दीतील ५० टक्के, उर्वरित रायगड जिल्ह्यासाठी २५ टक्के आणि जिल्ह्याबाहेरील २५ टक्के असा कोटा निश्चित करण्यात आला आहे. नागरिकांनी या अकादमीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
क्रिकेटपटूंचा सत्कार
या कार्यक्रमात पनवेल परिसरातील क्रिकेट क्षेत्रातील नामवंत खेळाडू व मान्यवर प्रशिक्षकांचा मान्यवरांच्या शुभ हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी माजी नगरसेवक तसेच महापालिकेचे परिवहन व्यवस्थापक कैलास गावडे, उपायुक्त सर्वश्री डॉ. वैभव विधाते, प्रसेनजित कारलेकर, रविकिरण घोडके, मंगला माळवे, स्वरूप खारगे, सहायक आयुक्त श्रीराम पवार, डॉ. रूपाली माने, सुबोध ठाणेकर, शहर अभियंता संजय कटेकर, मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. राजू पाटोदकर, तसेच क्रिकेट क्षेत्रातील मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर कार्यक्रमाचे आभार परिवहन व्यवस्थापक कैलास गावडे यांनी मानले