spot_img
2.9 C
New York
Thursday, December 25, 2025

Buy now

spot_img
spot_img

गेटवे ऑफ इंडिया येथे ‘बिटींग रिट्रीट’

झुंजार सेनापती l मुंबई

भारतीय नौसेना दिनानिमित्त भारतीय नौदलाच्या पश्चिम विभाग मुख्यालयातर्फे गेटवे ऑफ इंडिया येथे आयोजित ‘बिटींग रिट्रीट’ आणि ‘टॅटू सेरेमनी’चा भव्य समारंभ राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. देशाची समुद्री शक्ती, शिस्त, संस्कृती आणि परंपरेचा अप्रतिम संगम अनुभवायला मिळालेल्या या समारंभाने नौदलाच्या शौर्यपरंपरेला आणि राष्ट्रीय अभिमानाला उजाळा दिला.

या प्रसंगी नौदलाच्या हेलिकॉप्टर्सचा रोमहर्षक फ्लाय-पास्ट, नेव्हल सेंट्रल बँडचे आकर्षक सादरीकरण, कुठल्याही मौखिक आदेशांशिवाय सातत्यपूर्ण कवायत तसेच सी कॅडेट कोअरच्या लहान मुलींनी सादर केलेला ‘हॉर्नपाईप सेलर्स डान्स’ यांना उपस्थित प्रेक्षकांची उत्स्फूर्त दाद मिळाली. नौदल दिनाच्या औचित्याने समुद्रातील जहाजांवर आकर्षक रोषणाईही करण्यात आली होती.

१९७१ च्या भारत–पाक युद्धादरम्यान ४ डिसेंबर रोजी भारतीय नौदलाने कराची बंदरावर केलेल्या निर्णायक हल्ल्यातील शौर्याच्या स्मृतीनिमित्त तसेच नौदलाच्या शहीद जवानांना आदरांजली वाहण्यासाठी दरवर्षी ४ डिसेंबर रोजी नौदल दिन साजरा केला जातो.

समारंभास नौदलाच्या पश्चिम कमानचे मुख्य ध्वज अधिकारी व्हाईस ॲडमिरल कृष्णा स्वामीनाथन, नौदलातील वरिष्ठ अधिकारी, माजी अधिकारी आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.  यावेळी नौदलाच्या जवानांनी कौशल्यपूर्ण  अनोख्या परंपरा सादर केल्या. विशेष आकर्षण ठरलेल्या आयएनएस शिकरा हेलिकॉप्टरच्या फ्लाय-पास्ट व ऑपरेशनल डेमोने भारतीय नौदलाची ताकद आणि अत्याधुनिक तांत्रिक क्षमता स्पष्टपणे दिसून आली. या भव्य आयोजनातून भारतीय नौदलाने केवळ आपल्या ऐतिहासिक परंपरा जपण्याचा संदेश दिला नाही, तर नव्या पिढीमध्ये राष्ट्रीय अभिमान, शिस्त आणि नौदलाच्या शौर्यकथांबद्दल प्रेरणा निर्माण करण्याचे कार्यही केले.

राज्यपालांची ‘नेव्ही हाऊस’ येथे मान्यवरांशी भेट

गेटवेवरील कार्यक्रमानंतर राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी  ‘नेव्ही हाऊस’ येथे आयोजित केलेल्या स्वागत समारंभ व चहापानाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहून निमंत्रित नौदल अधिकारी व माजी अधिकारी तसेच गणमान्य व्यक्तींना नौसेना दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी व्हाईस ॲडमिरल  कृष्णा स्वामीनाथन यांनी राज्यपालांना निमंत्रित मान्यवरांचा परिचय करून दिला.

Related Articles

नवी मुंबईतून विमानसेवेचा ऐतिहासिक प्रारंभ

झुंजार सेनापती l नवी मुंबई | प्रतिनिधी  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज विमानसेवेचा ऐतिहासिक प्रारंभ झाला. पहिल्याच दिवशी इंडिगो या विमान कंपनीचे पहिले विमान बेंगळुरू...

‘फार्म टू फॉरेन मार्केट’संकल्पना प्रत्यक्षात आणणारे वाशी येथील निर्यात सुविधा केंद्र

झुंजार सेनापती l प्रतिनिधी l वाशी येथे कार्यरत असलेले निर्यात सुविधा केंद्र (Export Facilitation Centre – EFC) हे महाराष्ट्रातील कृषी उत्पादनांच्या निर्यातीसाठी महत्त्वाचे केंद्र मानले...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!