झुंजार सेनापती l मुंबई
रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड बंदरातून काजू व इतर कृषी उत्पादनांची निर्यात सुरू करण्यासाठी आवश्यक प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिल्या. मंत्रालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते.
या बैठकीस महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. प्रदीप, मत्स्यव्यवसाय आयुक्त किशोर तावडे, मंत्री राणेंचे सल्लागार परशराम पाटील तसेच जेएसडब्ल्यू ग्रुपचे प्रतिनिधी उपस्थित होते.
निर्यात प्रक्रियेसाठी आवश्यक ती सर्व मदत शासनाकडून दिली जाईल, असे सांगून मंत्री राणे यांनी कोकणातील उत्पादने जलद आणि सुलभपणे निर्यात होण्यासाठी ही प्रक्रिया महत्त्वाची असल्याचे स्पष्ट केले. बंदराशी जोडणीसाठी कोल्हापूर–वैभववाडी रेल्वे मार्गाचे काम गतीने हाती घेण्यात येत असून, उत्पादन तपासणी प्रयोगशाळा १५ जानेवारीपर्यंत सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले. यंदाच्या हंगामात जयगड बंदरातून काजू निर्यात होण्यासाठी सर्व यंत्रणांनी सज्ज राहावे तसेच उत्पादकांसाठी जनजागृती कार्यशाळा आयोजित कराव्यात, असेही त्यांनी सांगितले.



