spot_img
spot_img

अकरावी प्रवेश प्रक्रियेला सुरुवात; विद्यार्थ्यांना १० कॉलेजांचा पसंतीक्रम देण्याची संधी

झुंजार सेनापती l  मुंबई
राज्यातील इयत्ता ११ वी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेअंतर्गत शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी नियमित कॅप फेरी-१ चे वेळापत्रक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने जाहीर केले आहे. दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रवेश अर्जाचा भाग-१ आणि भाग-२ भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून, ८ मेपर्यंत तब्बल ७ लाख ७४ हजार ९१८ विद्यार्थ्यांनी नोंदणी पूर्ण केली आहे.
विद्यार्थ्यांनी इयत्ता ११ वी प्रवेश प्रक्रियेसाठी अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाईन अर्ज सादर करावेत, असे आवाहन शिक्षण संचालनालयाने केले आहे. प्रवेश प्रक्रियेमध्ये तीन नियमित फेऱ्या, ‘ओपन टू ऑल’ चौथी फेरी तसेच मुलींसाठी विशेष पाचवी फेरी आयोजित करण्यात येणार आहे.
शून्य फेरीअंतर्गत ८ ते २० मे दरम्यान विद्यार्थ्यांना नोंदणी व अर्जाचा भाग-१ ऑनलाईन सादर करण्याची सुविधा उपलब्ध राहणार आहे. याच कालावधीत तात्पुरती गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणे, हरकती व दुरुस्ती मागवणे, अंतिम गुणवत्ता यादी जाहीर करणे तसेच विविध कोट्यांतील रिक्त जागांचे प्रत्यार्पण करण्यात येणार आहे.
नियमित कॅप फेरी-१ साठी नवीन विद्यार्थ्यांची नोंदणी, भाग-१ मधील दुरुस्ती तसेच भाग-२ भरण्याची प्रक्रिया २१ आणि २२ मे रोजी पार पडणार आहे. विद्यार्थ्यांना किमान एक आणि कमाल दहा कनिष्ठ महाविद्यालयांना पसंतीक्रम देण्याची सुविधा देण्यात आली आहे.
कॅप फेरी-१ ची अलॉटमेंट प्रक्रिया २३ ते २६ मे दरम्यान होणार असून, २६ मे रोजी प्रवेश वाटप यादी जाहीर केली जाणार आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या लॉगिनद्वारे संबंधित कनिष्ठ महाविद्यालयाची माहिती मिळणार असून, एसएमएसद्वारेही संदेश पाठवले जाणार आहेत.
प्रवेश निश्चित करण्यासाठी विद्यार्थ्यांनी २६ ते २८ मे दरम्यान संबंधित कनिष्ठ महाविद्यालयात जाऊन कागदपत्र पडताळणी व शुल्क भरण्याची प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक राहणार आहे. त्यानंतर २९ मे रोजी रिक्त जागांची माहिती प्रसिद्ध करण्यात येईल, तर ३० मे रोजी दुसऱ्या फेरीचे वेळापत्रक जाहीर केले जाणार आहे.
प्रवेश प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन शिक्षण संचालनालयाने केले आहे. तसेच [email protected] या ई-मेलवर किंवा ८५३०९५५५६४ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे.

Related Articles

सुरक्षारक्षकाचा घाणेरडा प्रकार; चार मुलींना टेरेसवर नेऊन अत्याचाराचा प्रयत्न

■ झुंजार सेनापती l  पिंपरी-चिंचवड पुण्यातील नसरापूर आणि पर्वती परिसरातील धक्कादायक घटनांची चर्चा सुरू असतानाच पिंपरी-चिंचवड शहरातून पुन्हा एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. शहरातील...

ठाणे-मुलुंडदरम्यान नवीन रेल्वे स्थानक; प्रवाशांना मोठा दिलासा

■ झुंजार सेनापती l मुंबई ठाणे आणि मुलुंडदरम्यान नवीन रेल्वे स्थानक उभारण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून यामुळे लाखो प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे....

ताज्या बातम्या

error: Content is protected !!