⬤ झुंजार सेनापती l मुंबई
मुंबई, दि. ११ : शेतकऱ्यांना शेतीसाठी पुरेसे पाणी उपलब्ध व्हावे यासाठी जलसाठा वाढविणे, सिंचन क्षमता विस्तार करणे आणि पाण्याचे प्रभावी व्यवस्थापन करणे आवश्यक असून सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश पाणीपुरवठा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी दिले.
निर्मल भवन येथील आढावा बैठकीत त्यांनी तलाव, धरणे, कालवे दुरुस्ती, नदी खोलीकरण, चेकडॅम उभारणी आणि पुराचे पाणी साठविण्याचे नियोजन करण्याच्या सूचना दिल्या. पूरनियंत्रणाची कामे दर्जेदार पद्धतीने पूर्ण करावीत तसेच जलयुक्त शिवार आणि ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ योजना प्रभावीपणे राबवाव्यात, असेही त्यांनी सांगितले.
सिंचन क्षेत्र वाढविण्यासाठी पाइपलाइनद्वारे पाणी वितरण, ठिबक सिंचन आणि कार्यक्षम पाणी वापर तंत्रज्ञानावर भर देण्यात आला. पाण्याची बचत आणि जलसाठा वाढल्यास शेती उत्पादनवाढीस चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला



