⬤ झुंजार सेनापती l मुंबई
प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांवरील कारवाईत गंभीर अनियमितता केल्याप्रकरणी राज्य सरकारने अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) अधिकाऱ्यांवर मोठा कारवाईचा बडगा उगारला आहे. चार अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले असून, अन्य २१ अधिकाऱ्यांविरुद्ध विभागीय चौकशी सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे.
ठाण्यातील हायस्ट्रीट इम्पेक्स एलएलपी आणि पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील सोएक्स इंडिया प्रा. लि. या दोन कंपन्यांवरील कारवाईत गंभीर अनियमितता झाल्याचे चौकशीत समोर आले. अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या माध्यमातून करण्यात आलेल्या चौकशीनंतर ही कारवाई करण्यात आली.
निलंबित अधिकाऱ्यांमध्ये अन्न सहआयुक्त दिगंबर भोगावडे, अन्न सहायक आयुक्त यदुराज दहातोंडे आणि अन्न सुरक्षा अधिकारी अशोक इलागेर व सी. आर. स्वामी यांचा समावेश आहे.
कारवाईसाठी दबाव आणल्याचा ठपका
हायस्ट्रीट इम्पेक्स प्रकरणात संबंधित उत्पादनावर खाद्यपदार्थ म्हणून वापरास मनाई असल्याचे स्पष्ट नमूद असतानाही अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली. या कारवाईसाठी अधिकाऱ्यांवर दबाव आणल्याचा उल्लेख चौकशी अहवालात आहे. कारवाईस नकार देणाऱ्या सहायक आयुक्त पी. पी. सूर्यवंशी यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याची बाबही समोर आली आहे.
३१ कोटींचा तंबाखूजन्य साठा जप्त
मावळ तालुक्यातील टाकवे येथील सोएक्स इंडिया कंपनीवर २ जानेवारी २०२६ रोजी विशेष भरारी पथकाने छापा टाकला होता. या कारवाईत तब्बल ३१ कोटी ६७ लाख २१ हजार ९८७ रुपये किमतीचा, ५ लाख ४८ हजार ४८८ किलो प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांचा साठा जप्त करून कंपनीचे आस्थापन सील करण्यात आले होते.
२१ अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी
दोन्ही प्रकरणांतील अधिकाऱ्यांची भूमिका, कारवाईची कायदेशीर वैधता, अधिकारक्षेत्र आणि प्रशासकीय आदेशांचे पालन यांची विभागीय चौकशीत तपासणी होणार आहे. अन्न सुरक्षा आणि सार्वजनिक आरोग्याशी संबंधित कारवाईत कायद्याचे पालन व प्रशासकीय उत्तरदायित्वाला सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल, असा इशारा अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिला.



