⬤ झुंजार सेनापती l मुंबई
दिवाळीचा आनंद शेतकऱ्यांच्या घरापर्यंत पोहोचवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यंदा नागपूर जिल्ह्यातील दुष्काळाच्या छायेत असलेल्या लोहारी सावंगा गावात मुक्काम केला. शेतकऱ्यांसोबत दिवाळीचा फराळ करत त्यांनी त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. केवळ आश्वासनांपुरते न थांबता गावासाठी सिंचन विहिरी आणि साठवण तलावाच्या माध्यमातून पाण्याच्या सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्णय जाहीर केले.
लोहारी सावंगा गावाची लोकसंख्या ४ हजार २६४ असून येथे ८४४ कुटुंबे वास्तव्यास आहेत. कापूस, तूर, संत्रा, मोसंबी, सोयाबीन, हरभरा आणि गहू ही येथील प्रमुख पिके आहेत. मात्र, यंदा पावसाअभावी पिके करपली असून संत्र्याच्या बागाही सुकल्या आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी थेट शेताच्या बांधावर जाऊन नुकसानग्रस्त पिकांची पाहणी केली आणि शेतकऱ्यांशी संवाद साधला.
दहा शेतकऱ्यांना सिंचन विहिरींचा लाभ
सिंचन विहीर योजनेअंतर्गत गावातील दहा शेतकऱ्यांना विहिरी मंजूर करण्यात आल्या आहेत. त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांना शेतीसाठी पाण्याची सुविधा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.
लाभार्थी शेतकरी : १. विमल शामराव खडगा २. सुमन रामभाऊ थापले ३. रामचंद्र मधुकर घोडे ४. मेघनाथ भिमराव राऊत ५. खुशाल महादेव बरडे ६. धनराज सदाशिव वैद्य ७. तेजराव नथुजी फंदी ८. संध्याताई मनोहर राऊत ९. रमेश चंपत काळे १०. दानीश खान हनिफ पठाण
साठवण तलावामुळे पाणीप्रश्न सुटण्यास मदत
लोहारी सावंगा येथे साठवण तलाव उभारण्याचाही निर्णय यावेळी जाहीर करण्यात आला. लघु सिंचन, मृद व जलसंधारण विभागाच्या सन २०२२-२३ च्या दरसूचीनुसार या प्रकल्पाचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. वन विभागाच्या मान्यतेने या तलावासाठी भूसंपादनही करण्यात आले आहे.
या तलावामुळे शेतीच्या सिंचनासाठी पाणी उपलब्ध होण्यास मदत होणार असून गावातील विहिरींच्या पाणीपातळीत वाढ होण्याची अपेक्षा आहे. परिणामी, पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही काही प्रमाणात सुटण्यास मदत होईल. परिसरातील शेती आणि शेतकऱ्यांच्या जीवनमानावर या प्रकल्पाचा सकारात्मक परिणाम होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
‘मुख्यमंत्री आमच्यात आले, आमचे दुःख ऐकले!’
मुख्यमंत्री गावात मुक्कामाला आले, त्यांनी आमच्यासोबत दिवाळीचा फराळ केला, शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेतल्या आणि पाण्याच्या योजनांची घोषणा केली. त्यामुळे गावात नव्या आशेचा किरण निर्माण झाला आहे, अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.
शेतकऱ्यांना तात्पुरत्या मदतीसोबत कायमस्वरूपी सिंचन सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने या निर्णयांकडे पाहिले जात आहे.


