spot_img
34.9 C
New York
Tuesday, July 8, 2025

Buy now

spot_img

उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण करून ‘बेस्ट’ व्हा !

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

झुंजार सेनापती l सोमनाथ पाटील

 मुंबईतील नागरिकांची जीवनवाहिनी म्हणून ‘बेस्ट’ची ओळख आहे. नागरिकांचा प्रवास अधिक सुखकर, आरामदायी होण्यासाठी ‘बेस्ट’ने अत्याधुनिक बस आणि प्रभावी सोयीसुविधा पुरविण्यासोबत स्वत:चे उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

सह्याद्री अतिथीगृह येथे बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रमाच्या (बेस्ट)आढावा बैठकीत मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड आशिष शेलार, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी. गुप्ता, मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी,  नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, परिवहन विभागाचे अपर मुख्य सचिव संजय सेठी, ऊर्जा विभागाच्या अपर मुख्य सचिव आभा शुक्ला, ‘बेस्ट’चे महाव्यवस्थापक एस. व्ही. आर श्रीनिवास आदींसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, मुंबईतील नागरिकांना प्रवास करताना जास्त ताटकळत थांबावे लागू यासाठी नियोजन करावे. बसच्या संख्या वाढविण्यासोबत बस किती वेळात येणार, सध्या कुठे आहे, याची माहिती प्रवाशांना होण्यासाठीच्या यंत्रणेची त्वरित अंमलबजावणी करावी. बांद्रा, दिंडोशी आणि देवनार बस डेपोंचा पुनर्विकास करताना जागा भाडेतत्वावर देताना धोरण ठरवावे. त्याठिकाणी व्यावसायिक गाळे, रहिवास आणि बेस्ट बस आगार अशा पद्धतीने रचना केल्यास बेस्टचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल. मुंबईतील छोटे, अरूंद रस्ते पाहता अत्याधुनिक छोट्या बस घ्याव्यात. यासाठी केंद्र सरकारकडून येणाऱ्या एन कॅपच्या (नॅशनल क्लिन एअर पॉलिसी) निधीचा वापर करावा.

मुंबईमध्ये लोकल रेल्वे, मेट्रो, मोनोरेल आणि बससाठी सार्वजनिक वाहतूक प्रणाली एका सिंगल मोबिलिटी प्लॅटफॉर्मवर आणण्याची प्रणाली तयार होत आहे. यातून नागरिकांना एकाच तिकिटामध्ये प्रवास करता येणार असल्याने बेस्टला याचाही फायदा होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

पाच बस डेपोच्या ठिकाणी मराठी सिनेमा थिएटर

बस डेपोंचा पुनर्विकास करताना करमणूक केंद्राचाही विचार करण्याबाबत मंत्री श्री. शेलार यांनी सूचना केल्या. मराठी सिनेमाला उर्जितावस्था येण्यासाठी पाच ठिकाणी मराठी सिनेमा थिएटरची निर्मिती केल्यास यातूनही उत्पन्न वाढण्यास मदत होईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

‘मनपा’च्या बजेटमध्ये निधीची तरतूद

‘बेस्ट’वरील खर्चाचा भार कमी करण्यासाठी प्रत्येक वर्षी मुंबई महानगरपालिका मदत करते. मात्र ‘मनपा’च्या बजेटमध्ये तीन टक्के वाहतुकीसाठी राखीव तरतूद केली तर याचा ‘बेस्ट’ला फायदा होईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

यावेळी बेस्टचे व्यवस्थापक श्री. श्रीनिवास यांनी टोल माफ करावेत, कर्मचाऱ्यांच्या देण्यापोटीची १६५८ कोटी मिळावेत. सरकारी कर माफ करण्याची मागणी केली. याबाबत प्रस्ताव सादर करावेत, शासन याचा सकारात्मक विचार करेल, असे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

छोट्या गाड्यांचा प्रस्ताव तयार करा-उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, नागरिकांच्या सोयीसाठी मेट्रो स्टेशन आणि बेस्ट बसच्या मार्गाचे नियोजन करावे. यासाठी छोट्या अत्याधुनिक बसचा प्रस्ताव तयार करावा. नागरिकांच्या करानुसार सोयीसुविधा पुरविण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिल्या. मुंबई शहरात बेस्टच्या विविध ठिकाणी जागा आहेत, त्यातूनही उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करावेत.

 

बेस्टच्या वातानुकूलित बसचे उद्घाटन

बेस्टच्या ताफ्यात ५०३ वातानुकूलित आणि पूर्ण इलेक्ट्रिकल बस दाखल झाल्या आहेत. यातील विक्रोळी ते मुंबई सेंट्रल या बसला हिरवी झेंडी दाखवून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. मुंबईसाठी २,१०० वातानुकूलित बसची खरेदी करण्यात आली असून यातील ५०३ बस मिळाल्या असून आणखी २,४०० बस मागविण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

 

‘जीपीएस’साठी गुगलशी करार

प्रवाशांना सध्या बस कुठे आहे, किती वेळेत येईल, यानुसार प्रवासाचे नियोजन करण्यासाठी जीपीएस सिस्टीमचा उपयोग होणार आहे. यासाठी बेस्ट गुगलशी करार करणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

बेस्ट बसची सद्यस्थिती

सध्या बेस्टकडे २,७८३ बस; यामध्ये ८७५ इलेक्ट्रीक बस

लोकसंख्येच्या तुलनेत सात हजार बसची आवश्यकता

रिक्षा, मेट्रो, टॅक्सीपेक्षा कमी भाडे; भाडेवाढीची मागणी

२०२७ पर्यंत सर्व बस इलेक्ट्रीक करण्याचा ‘बेस्ट’चा मानस

Related Articles

राज्यात रिक्त पदांसाठी लवकरच ‘मेगा भरती’

झुंजार सेनापती l सोमनाथ पाटील  राज्य शासनाने सर्व विभागांना १५० दिवसांचा उद्दिष्टांचा कार्यक्रम दिला आहे. या कार्यक्रमांतर्गत आकृतीबंध, नियुक्ती नियम (रिक्रुटमेंट रूल) सुधारित करणे, अनुकंपा तत्वावरील...

फळपिक विमा योजनेचे अर्ज करण्यासाठी चार दिवसांची मुदतवाढ

झुंजार सेनापती l मुंबई हवामान आधारित फळपिक विमा योजनेच्या मर्यादित कालावधीत केंद्र सरकारने मुदतवाढ करून राज्यातील फळपिक शेतकऱ्यांना दिलासा दिल्याची माहिती कृषिमंत्री अॅड. माणिकराव कोकाटे...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!