झुंजार सेनापती l सोमनाथ पाटील
महाराष्ट्र शासन व भारतीय रेल्वे खानपान व पर्यटन महामंडळाने (IRCTC), आपल्या ऐतिहासिक व सांस्कृतिक वारशाला उजाळा देण्यासाठी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनगौरवाचा अनुभव देण्यासाठी एक विशेष पर्यटक ट्रेन ‘छत्रपती शिवाजी महाराज सर्किट’ ची घोषणा केली आहे. भारत गौरव टुरिस्ट ट्रेन (Bharat Gaurav Tourist Train) दि.9 जून 2025 पासून सुरू होत आहे. छत्रपती शिवाजी महाराज सर्किट अंतर्गत भारत गौरव ट्रेनला हिरवा झेंडा दाखवून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ होणार आहे. या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, पर्यटन मंत्री शंभुराज देसाई व पर्यटन राज्यमंत्री इंद्रनिल नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे.
महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभाग व महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांच्या सहभागाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या तेजस्वी इतिहासाची साक्ष देणाऱ्या ऐतिहासिक स्थळांना व्यापक प्रसिद्धी मिळवून देण्याचा महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचा आणि शासनाचा मानस आहे.
या 5 दिवसांच्या विशेष सहलीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनाशी संबंधित महत्त्वाच्या ऐतिहासिक स्थळांना भेट, इतिहासावर आधारीत कार्यक्रम आयोजित केले आहेत तरी पर्यटकांनी याचा अनुभव घ्यावा, असे आवाहन पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी केले आहे.
भारतीय रेल्वे विभाग आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ महाराष्ट्र शासनाशी समन्वय साधून, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथे या गौरवशाली ट्रेनचे हे आगमन महाराष्ट्राच्या संस्कृतीचे भव्य दर्शन घडवणारे ठरेल. भारत गौरव ट्रेन ज्या-ज्या ठिकाणी पोहोचेल, त्या ठिकाणी असलेल्या पर्यटन स्थळांची सविस्तर माहीती पर्यटकांना देण्यात येणार आहे. दि.09 जुन 2025 रोजी पासून सुरु होणारी ट्रेन पुर्णत: आरक्षित झाली असुन पर्यटकांनी चांगली पसंती दिली आहे.
सर्व प्रवाशांचा अनुभव सुखकर आणि संस्मरणीय व्हावा, यासाठी महामंडळाचे अधिकारी आयआरसीटीसीच्या समन्वयाने प्रत्येक टप्प्यावर मार्गदर्शन करतील. 5 दिवसांच्या या प्रवासात रेल्वे स्थानकांपासून ते महाराजांच्या गडकिल्ल्यांपर्यंत, प्रत्येक ठिकाणी इतिहासाच्या पाऊलखुणांचा वेध घेत, पर्यटकांना पर्यटनाचा आनंद घेता येईल, असे राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी सांगितले आहे.
पर्यटन विभागाचे प्रधान सचिव डॉ.अतुल पाटणे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभत आहे. “छत्रपती शिवाजी महाराजांचा जाज्वल्य इतिहासाच्या या सहलीमुळे महाराष्ट्राच्या पर्यटनाला एक वेगळा आयाम मिळणार आहे. या उत्साही यात्रेत सहभागी होऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा वसा उचलावा, आपल्या संस्कृतीचा अभिमान बाळगावा, आणि नव्या पिढीला या इतिहासाचे दर्शन घडवावे”, असे आवाहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मनोजकुमार सूर्यवंशी यांनी केले आहे.
या उपक्रमासाठी महामंडळाचे सर्व अधिकारी समन्वय आणि परीश्रम करीत असून, छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकिल्ले, महाराष्ट्राची समृद्ध परंपरा आणि लोकसंस्कृती सर्वांपर्यंत पोहोचविण्यासाठी महामंडळ सतत प्रयत्नशील आहे.
भारतीय रेल्वे खानपान व पर्यटन महामंडळ (IRCTC) प्रस्तुत – “छत्रपती शिवाजी महाराज सर्किट” विशेष पर्यटक ट्रेन –भारत गौरव टुरिस्ट ट्रेन (Bharat Gourav Tourist Train).
सहल तपशील –
सहलीचे नाव: छत्रपती शिवाजी महाराज सर्किट
शुभारंभ दिनांक: 09 जून 2025
कालावधी: 5 दिवस / 6 दिवसांची यात्रा (सकाळी समाप्ती)
प्रारंभ व समाप्ती स्थान: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT), मुंबई
इतर चढाई/उतराई स्थानकं: दादर, ठाणे
यात्रेचा प्रवासमार्ग –
मुंबई (CSMT) – रायगड – पुणे – शिवनेरी – भीमाशंकर – प्रतापगड – कोल्हापूर – पन्हाळा – मुंबई.
प्रमुख स्थळांची माहिती –
रायगड किल्ला – छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक येथे झाला व ही राजधानी होती.
लाल महाल, पुणे – छत्रपती शिवाजी महाराज यांचे बालपण येथे गेले.
कसबा गणपती व शिवसृष्टी, पुणे – पुण्याचे ग्रामदैवत व छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील संग्रहालय.
शिवनेरी किल्ला – छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थळ.
भीमाशंकर ज्योतिर्लिंग – 12 ज्योतिर्लिंग पैकी एक प्रमुख धार्मिक स्थळ.
प्रतापगड किल्ला – अफझल खानावरील ऐतिहासिक विजयाचे ठिकाण.
कोल्हापूर – महालक्ष्मी मंदिर
पन्हाळा किल्ला – बाजीप्रभू देशपांडे यांच्या शौर्याचे प्रतीक.
पॅकेज शुल्क (प्रति व्यक्ती): –
उपरोक्त सहलासाठी विविध पॅकेजिस तयार करण्यात आली असुन सोयीनुसार इकोनॉमी (SL), कम्फर्ट (3 AC), सुपीरियर (2 AC) अशा प्रकारच्या सुविधांची निवड करता येणार आहे. सदरच्या पॅकेज बाबत सविस्तर माहीती IRCTC च्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.
पॅकेज मध्ये समाविष्ट सेवा: –
भारत गौरव ट्रेनने प्रवास (SL / 3AC / 2AC)
AC / Non-AC हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था
सर्व ठिकाणी स्थानिक वाहतूक व गाईड
ऑनबोर्ड व ऑफबोर्ड शुद्ध शाकाहारी भोजन
प्रवास विमा, सर्व प्रवेश शुल्क (किल्ले, मंदिरे, रोपवे, शिवसृष्टी इत्यादी)
सुरक्षा व्यवस्था.
दैनंदिन टूर कार्यक्रम (संक्षिप्त): –
पहिला दिवस: मुंबई – रायगड – पुणे.
दुसरा दिवस: पुणे (लाल महाल, शिवसृष्टी, कसबा गणपती).
तिसरा दिवस: शिवनेरी – भीमाशंकर – पुणे.
चौथा दिवस: प्रतापगड – कोल्हापूर.
पाचवा दिवस: कोल्हापूर – महालक्ष्मी मंदिर – पन्हाळा किल्ला – मुंबई.
सहावा दिवस: मुंबई (टूर समाप्त).
आरक्षण व अधिक माहिती साठी संपर्क: –
IRCTC वेबसाईट: www.irctctourism.com किंवा www.mtdc.co