झुंजार सेनापती l मुंबई
नागपूर-गोवा शक्तिपीठ द्रुतगती महामार्गामुळे प्रवासाची वेळ आठ तासांवर येणार असून या महामार्गामुळे मराठावाड्याचे चित्र पालटणार आहे. तसेच नवीन प्रस्तावित मुंबई-कल्याण-लातूर जन कल्याण द्रुतगती महामार्ग जाहीर करण्यात आला आहे. यामुळे लातूर ते मुंबई प्रवास केवळ 4.5 तासांवर येणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नागपूर येथे सांगितले.
राज्यात मेट्रो आणि पायाभूत सुविधांच्या कामांना गती देण्यात आली असून सध्या मुंबईत ९१ किलोमीटर लांबीची मेट्रो सेवा कार्यरत आहे. या मार्गांवरून दररोज सुमारे ९ लाख ५० हजार प्रवासी प्रवास करत आहेत. पुढील दोन वर्षांत या कार्यरत लांबीमध्ये आणखी १३२ किलोमीटरची भर पडणार असून पुण्यात ३३ किलोमीटर मेट्रो मार्ग सुरू असून त्याचा लाभ दररोज २.२३ लाख प्रवासी घेत आहेत. पुण्यात आणखी ४५ किलोमीटरचे काम प्रगतीपथावर असून त्यातील २७ किलोमीटर पुढील दीड वर्षात पूर्ण करण्याचे नियोजन आहे. नागपूरमध्ये ४० किलोमीटर मेट्रो मार्ग पूर्ण झाला असून रोज १.१० लाख प्रवासी त्याचा वापर करत आहेत, तर ४३ किलोमीटरचा नवा टप्पा पुढील दोन वर्षांत पूर्ण केला जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिली.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, मुंबईतील इतर महत्त्वाच्या पायाभूत प्रकल्पांनाही वेग देण्यात आला आहे. ऑरेंज गेट ते मरीन ड्राइव्ह भुयारी मार्ग, उत्तर सागरी किनारा मार्ग, वांद्रे ते वर्सोवा, वर्सोवा-दहिसर आणि दहिसर-भाईंदर रस्ता यासह भाईंदर उत्तर ते विरार सागरी मार्गाला मान्यता देण्यात आली आहे. ठाणे–बोरिवली भुयारी मार्ग, गोरेगाव–मुलुंड लिंक रोड, उलवे सागरी किनारा मार्ग, अटल सेतू इंटरचेंज तसेच ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पांचे काम अंतिम टप्प्यात आहे. याशिवाय पुण्याच्या चक्राकार मार्गाच्या कामालाही सुरुवात करण्यात आली असून, या सर्व प्रकल्पांमुळे राज्यातील शहरी वाहतूक व्यवस्था अधिक गतिमान होण्याची अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
‘अमृतकाल रस्ते योजने’अंतर्गत रस्त्यांचा दर्जा, वाहतूक, मुख्य केंद्रांशी जोडणी यांचा विचार करून योजनेनुसार रस्ते विकास केला जात असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. समृद्धी महामार्गाच्या विस्ताराअंतर्गत नागपूर–गोंदिया 162 कि.मी. द्रुतगती महामार्गासाठी 18,539 कोटी रुपयांचा प्रकल्प अंतिम टप्प्यात असून, जमीन संपादन पूर्ण होताच नागपूरहून गोंदियाचा प्रवास अवघ्या सव्वा तासात शक्य होणार असल्याचे त्यांनी सांगितले.



