झुंजार सेनापती l मुंबई
उत्तर प्रदेशातील मथुरा लोकसभा मतदारसंघाच्या खासदार आणि ज्येष्ठ अभिनेत्री हेमा मालिनी यांनी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मतदानाचा हक्क बजावला. २०१४ पासून मथुरेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या हेमा मालिनी यांनी मुंबईत मतदान केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
मतदानानंतर मात्र मतदान केंद्रावरील गोंधळ आणि व्यवस्थापनातील त्रुटींचा मुद्दा पुढे आला. केंद्राबाहेर पडत असताना काही नागरिकांनी थेट हेमा मालिनी यांच्याकडे तक्रारी मांडल्या. मतदानासाठी झालेली गर्दी, नियोजनाचा अभाव आणि मूलभूत सुविधांची कमतरता यामुळे नागरिक त्रस्त झाल्याचे पाहायला मिळाले.
एका ज्येष्ठ नागरिकाने संतप्त प्रतिक्रिया देत सांगितले की,
“मी गेल्या ६० वर्षांपासून या भागात राहतो, पण आजसारखी गैरसोय कधी पाहिली नाही.”
या घटनेमुळे मतदान प्रक्रियेतील गैरव्यवस्थापन आणि प्रशासनाच्या तयारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवरही टीका होत आहे. मुंबईसारख्या महानगरात मतदानाच्या दिवशीच असा गोंधळ उडाल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.



