spot_img

मुंबईकरांच्या सेवेसाठी लवकरच वंदे मेट्रोच्या अत्याधुनिक एसी लोकल ट्रेन

झुंजार सेनापती l मुंबई
मुंबईकरांची जीवनवाहिनी असलेल्या उपनगरी लोकल सेवेच्या आधुनिकीकरणाला वेग आला असून लवकरच वंदे मेट्रोच्या अत्याधुनिक एसी लोकल गाड्या मुंबईत दाखल होणार आहेत. मुंबई रेल्वे विकास महामंडळाने (एमआरव्हीसी) २३८ नव्या रेकसाठी निविदा प्रक्रिया सुरू केली असून हा प्रकल्प लोकल प्रवासाचा चेहरामोहरा बदलणारा ठरणार आहे.
एमयूटीपी टप्पा-३ आणि ३-अ अंतर्गत या गाड्या सेवेत आणल्या जाणार असून पुढील ३५ वर्षांच्या देखभालीची जबाबदारीही करारात समाविष्ट करण्यात आली आहे. वंदे मेट्रो रेक इंटर-कार गँगवे आणि वॉक-थ्रू डिझाइनसह तयार होणार असल्याने डब्यांतील गर्दीचे नियोजन अधिक प्रभावीपणे करता येणार आहे.
नव्या लोकलमध्ये उभे राहण्यासाठी प्रशस्त जागा, आरामदायी मॉड्युलर आसने, दिव्यांग व व्हीलचेअर प्रवाशांसाठी राखीव जागा आणि मोठ्या खिडक्या अशी आधुनिक सुविधा असणार आहे. त्यामुळे प्रवास अधिक सुरक्षित, आरामदायी आणि प्रवासी-केंद्रित होईल, असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
कराराला मंजुरी मिळाल्यानंतर पुढील अडीच वर्षांत पहिली प्रोटोटाइप ट्रेन दाखल होण्याची शक्यता आहे. सर्व २३८ गाड्या मुंबईत पूर्णपणे दाखल होण्यासाठी अंदाजे सहा वर्षांचा कालावधी लागू शकतो. ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत १२, १५ आणि १८ डब्यांच्या गाड्यांचा समावेश असणार असून वाढत्या प्रवासी गर्दीचा विचार करून कर्जत आणि पश्चिम रेल्वे मार्गावर दोन नवीन मेगा देखभाल डेपो उभारले जाणार आहेत. मुंबईच्या लोकल व्यवस्थेत यामुळे तांत्रिक आणि सेवा गुणवत्तेचे नवे पर्व सुरू होणार असल्याचे मानले जात आहे.

Related Articles

मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेच्या १,२४० कोटींचा लाभ मच्छिमारांपर्यंत पोहोचवा!

⬤ झुंजार सेनापती l मुंबई मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत समाविष्ट असलेल्या जिल्हास्तरीय २२ योजनांची प्रभावी आणि प्राधान्याने अंमलबजावणी करण्यासाठी शासनाने प्रशासकीय हालचालींना वेग दिला आहे....

दुष्काळात रोजगाराची मागणी करणाऱ्या प्रत्येक पात्र कुटुंबाला काम द्या!

⬤ झुंजार सेनापती l मुंबई राज्यातील दुष्काळी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन रोजगार हमी योजना आणि ‘व्हीबी जी राम जी’ अंतर्गत रोजगारनिर्मितीची कामे सर्व स्तरांवर...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!