कोल्हापुरात उत्तरसाठी दोन्ही पक्षात धुसफुस ; इच्छुक नेते बंड करण्याच्या मनस्थितीत !
विधानसभेचा अर्ज दाखल करण्यासाठी अवघे काहीच दिवस राहिलेत मात्र कोल्हापूरच्या उत्तर विधानसभा मतदारसंघात जागा वाटपाचा तिढा अजूनही सुटला नाही. कोल्हापूर मतदारसंघातील महायुतीचे आणि महाविकास आघाडीचे दोन्हीही उमेदवार अजून न ठरल्याने दोन्ही पक्षांमध्ये अजूनही खदखद व्यक्त होत आहे. तर एका पक्षात एकापेक्षा अधिक इच्छुक उमेदवार असल्याने जागे संदर्भात मोठा संघर्ष निर्माण झालाय. त्यामुळे महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही पक्षांमधील इच्छुक उमेदवार आता बंडाळी करतात की काय असाच प्रश्न पडला आहे.
एकीकडे महायुतीमध्ये कोल्हापूरच्या उत्तर मतदार संघासाठी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर तर भाजपकडून जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सत्यजित उर्फ नाना कदम आणि युथ आयकॉन अशी ओळख असणारे कृष्णराज महाडिक या तिघांमध्ये महायुतीच्या कोल्हापूर उत्तरच्या जागे संदर्भात संघर्ष पेटून उठलाय. तर दुसरीकडे महाविकास आघाडीत कोल्हापूर उत्तर साठी शिवसेना ठाकरे गटाकडून शिवसेनेचे उपनेते संजय पवार शिवसेना ठाकरे गटाचे शहर प्रमुख रविकिरण इंगवले इच्छुक आहेत. तर काँग्रेस कडून शारंगधर देशमुख, सचिन चव्हाण, तेज घाडगे, राजेश लाटकर या इच्छुकां सोबतच मधुरिमा राजे छत्रपती यांचही नाव आघाडीवर आहे. त्यामुळे महाविकास आघाडी असो किंवा महायुती कोल्हापूरच्या उत्तर बाबत अजूनही सस्पेन्स कायम आहे.
कोल्हापूर उत्तर मधून लढण्यासाठी गेली अडीच वर्ष राजेश क्षीरसागर यांनी तयारी केली आहे. तसेच नुकतीच शीर्षकर यांना महायुतीकडून उत्तरशी जागा मिळाली होती. मात्र याच मतदारसंघावर भाजपने दावा करत सत्यजित कदम आणि राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांचे पुत्र कृष्णराज महाडिक हे लढण्यासाठी तयारी दर्शवलीय. त्यामुळे क्षीरसागर यांना वेटिंग वर ठेवण्यात आलय.
तर महाविकास आघाडी मधून सध्याची परिस्थिती बघितली तर अजूनही महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा पेच कायम आहे. उत्तर च्या जागेवरून चाललेली रस्सीखेच ही आता एकमेकांवर आरोप प्रत्यारोपावर आलेली आहे. उत्तर च्या जागेवरून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट आक्रमक झालाय. तर ठाकरे गटाकडून रविकिरण इंगवले गेल्या काही दिवसांपासून मुंबईमध्ये तळ ठोकून असल्याचं दिसत आहे. एकंदरीत या सगळ्या परिस्थितीवरून कोल्हापूर उत्तर मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या जागे संदर्भात काँग्रेस आणि ठाकरे गटाकडून जोरदार आग्रह धरलाय. यामुळ उत्तरच्या महाविकास आघाडीच्या जागेसंदर्भात काय निर्णय होईल याची सर्वांनाच उत्कंठा लागून राहिले आहे. यावर आता वरिष्ठच सर्व निर्णय घेतील असं आमदार सतेज पाटील यांनी स्पष्ट केलंय.
कोल्हापूर उत्तर मतदारसंघातील महायुती आणि महाविकास आघाडीतील हा जागा वाटपाचा तिढा कधी सुटणार ? या दोन्ही जागा कोणत्या इच्छुक उमेदवाराला मिळणार ? आणि कोणता इच्छुक उमेदवार पर्यायाने बंडाळी करणार हे आता येणाऱ्या काही काळात स्पष्ट होईल.