10.4 C
New York
Tuesday, November 26, 2024

Buy now

spot_img

निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे – हिर्देशकुमार

झुंजार सेनापती l छत्रपती संभाजी नगर

 निवडणूक प्रक्रिया राबवितांना त्यात कोणत्याही शंकेला वाव असता कामा नये याची खबरदारी  निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी घ्यावी व निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे निर्देश भारत निवडणूक आयोगाचे उपनिवडणूक आयुक्त  हिर्देशकुमार यांनी आज निवडणूक यंत्रणांना दिले.

          छत्रपती संभाजी नगर येथील स्मार्ट सिटी कार्यालयात छत्रपती संभाजीनगर, नागपूर आणि अमरावती विभागातील सर्व जिल्ह्यांतील विधानसभा मतदारसंघांमधील निवडणूक पूर्वतयारीबाबत आढावा बैठक आज पार पडली. या बैठकीस राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम, अति.मुख्य निवडणूक अधिकारी बी. प्रदीपकुमार, उपसचिव सुमनकुमार, संजयकुमार, अभिलाष कुमार, अनिलकुमार, अविनाशकुमार तसेच विभागीय आयुक्त दिलीप गावडे, मनपा आयुक्त जी.श्रीकांत, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, छत्रपती संभाजीनगर परीक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक विरेंद्र मिश्रा, पोलीस आयुक्त प्रविण पवार, पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड आदी उपस्थित होते.

प्रत्येक टप्प्यावर पारदर्शकता जपा

प्रत्येक विधानसभा क्षेत्रात निवडणूक निर्णय अधिकारी यांनाच सर्व प्रक्रिया राबवावयाची आहे. राबवित असलेल्या निवडणूक विषयक कामकाजाबाबत प्रत्येक टप्प्यावर राजकीय पक्ष, उमेदवार यांच्या प्रतिनिधींना माहिती द्यावी व प्रक्रिया राबवावी. त्याचे दस्तऐवजीकरण करावे. त्यांचे शंकानिरसन करावे. निवडणूक प्रक्रिया राबवितांना पारदर्शकतेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे,असे हिर्देशकुमार यांनी सांगितले.

मतदान केंद्रांवर सर्व सुविधा पुरवा

मतदार याद्यांबाबतही योग्य ती काळजी घेऊन त्या याद्या अधिक बिनचूक असाव्यात. प्रत्येक मतदारापर्यंत मतदान चिठ्ठ्या वेळत पोहोचतील याचे नियोजन करा. मतदार याद्यांविषयी असलेल्या तक्रारींबाबत तात्काळ दखल घ्यावी.  मतदान केंद्रांबाबतही सर्व यंत्रणांनी खबरदारी घ्यावी. प्रत्येक मतदान केंद्रांवर पुरेशी सुरक्षा व्यवस्था, तात्पुरत्या मतदान केंद्रांची मान्यता घेणे, मतदान केंद्राचे ठिकाण बदलले असल्यास त्याबाबत मतदारांपर्यंत माहिती पोहोचविणे, त्याची प्रसिद्धी करणे, विशेष मतदान केंद्रांची निर्मिती करणे जसे. पर्यावरणपूरक, महिलांनी, दिव्यांग कर्मचाऱ्यांनी संचलित केलेले इ, मतदान केंद्रांवर पिण्याचे पाणी, रॅम्प, सावली इ. सुविधांची निर्मिती, तसेच वेब कॅमेरे व सीसीटीव्ही कॅमेरे लावून मतदान केंद्रांचे वेबकास्टिंग करणे, मतदान केंद्राच्या बाहेर व आत कॅमेरे लावावे इ. सुचना दिल्या. तसेच या सर्व सुविधांची पूर्तता झाल्याबाबत व आवश्यकतांबाबत स्वतः जिल्हा निवडणूक अधिकारी, पोलीस अधीक्षक, पोलीस आयुक्त यांनी स्वतः पाहणी करुन खातरजमा करावी,असे निर्देशही देण्यात आले.

 यंदा मतदान हे नोव्हेंबर महिन्यात असून आता सुर्यास्त लवकर होईल, अशा वेळी सायंकाळी मतदान केंद्रांवर पुरेशा प्रकाशासाठी दिवे लावण्याची सुविधा करावी,अशी सूचना देण्यात आली. कोणत्याही परिस्थितीत मतदान केंद्रात मोबाईल नेता येणार नाही, याबाबत योग्य ती काळजी घेण्याचे निर्देश देण्यात आले. टपाली मतदान व गृह मतदान प्रक्रियेबाबतही यंत्रणांनी पूर्ण प्रक्रिया व्यवस्थित राबवावी. गृह मतदान कार्यक्रम अगोदर जाहीर करावा. त्याबाबत उमेदवारांना कळवावे.

मतदान कर्मचाऱ्यांसाठी सुविधा द्या

निवडणूक कामकाजासाठी लागणारे पुरेस मनुष्यबळ उपलब्ध असल्याची खात्री करावी. आवश्यकतेनुसार मनुष्यबळ उपलब्ध करुन घ्यावे. नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांना जेवण, पिण्याचे पाणी, कामकाजाची सुविधा, मतदान केंद्रांवर गेल्यावर मुक्काम, मुक्कामाच्या ठिकाणी स्वच्छता, सुरक्षितता, भोजन, पाणी याबाबतची व्यवस्था पुरविण्यात यावी. महिला कर्मचाऱ्यांना विशेष सुरक्षा व सोयी सुविधा द्याव्या. निवडणूक कामकाजात कर्मचाऱ्यांना अचानक उद्भवणाऱ्या आजारांसाठी तात्काळ वैद्यकीय सेवा देण्याचे नियोजन असावे. त्यासाठी स्थानिक पातळीवर रुग्णालयांमध्ये खाटा राखीव ठेवाव्या. प्रत्येक निवडणूक कर्मचाऱ्याची योग्य काळजी घेतली जाईल, याची खबरदारी घ्यावी.

सी-व्हिजिल वरील तक्रारींचे तत्काळ निराकरण करा

प्रत्येक जिल्ह्यात व विधानसभा क्षेत्रात कायदा व सुव्यवस्था चोख ठेवण्यासाठी  सर्व संलग्न जिल्ह्यांच्या पोलीस यंत्रणांनी आपापसात समन्वय ठेवावा. मद्य, अंमलीपदार्थ, मौल्यवान वस्तू, रोकड यांच्या अवैध वाहतुकीवर नजर ठेवून कारवाई करावी. याबाबत सी व्हिजील ॲपवर येणाऱ्या तक्रारींची दखल घेऊन कारवाई करावी. या तक्रारींचे तत्काळ निराकरण  झाले पाहिजे, याबाबत विशेष काळजी घेण्याचे निर्देश देण्यात आले.

फेक न्यूजला तत्काळ पायबंद

निवडणूक काळात माध्यमांमध्ये येणाऱ्या बनावट बातम्या, फेक न्यूज अर्थात खोट्या माहितीचे प्रसारण तत्काळ रोखावे. खोटी माहिती असल्यास तिचे प्रसारण रोखून सत्य माहितीचे तात्काळ प्रसारण करावे.  याबाबत या विभागाशी संबंधित बातम्या असतील त्यांनी तात्काळ योग्य माहिती पुरवावी व वस्तूस्थिती जनतेसमोर मांडावी, जेणेकरुन निवडणूक प्रक्रियेवर परिणाम होणार नाही व त्याबाबत गैरसमज निर्माण होणार नाही.

मतदार जनजागृतीवर भर द्या

मतदारांचे मतदानाचे प्रमाण वाढावे यासाठी आयोगामार्फत लवकरच ‘स्विप’ उपक्रम मोठ्याप्रमाणावर राबविले जाणार आहेत. ते सर्व उपक्रम आपल्या विधानसभा क्षेत्रात राबवावेत. मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी प्रयत्न करावे. मतदारांना मतदान करणे सोईचे व सुलभ व्हावे यासाठी उपाययोजना राबवाव्यात.

अचूक आकडेवारीसाठी स्वतंत्र नोडल अधिकारी

मतदानाचे प्रमाण नेमके कळावे व त्यातील आकडेवारीत अधिक अचूकता यावी यासाठी या निवडणूकीत झालेल्या मतदानाच्या टक्केवारीसाठी स्वतंत्र नोडल अधिकारी विधानसभा मतदार संघस्तरावर, जिल्हास्तरावर आणि राज्यस्तरावर नेमण्यात येणार आहे. मतदान टक्केवारीची आकडेवारी बुथनिहाय पडताळणी करुन मतदान टक्केवारी अचूक देण्यात येईल यासाठी ही उपाययोजना करण्यात आल्याचेही निवडणूक उपायुक्त यांनी सांगितले.

मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन

मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. एस. चोकलिंगम म्हणाले की, राजकीय पक्ष उमेदवारांना वेळोवेळी अद्यावत निर्णय व माहिती देऊन अवगत करावे.मतमोजणीसाठी मतमोजणी केंद्राच्या पुनर्रचनेचा आराखडा नव्याने मंजूर करावयाचा असल्यास त्याचे प्रस्ताव तातडीने पाठवावे. टपाली मतमोजणीबाबतच्या व्यवस्थेसह आराखडा मंजूर करावा. निवडणूक कामकाजाविषयी सर्व अहवाल वेळेत व अचूक पाठविणे आवश्यक आहे. त्यात कोणतीही दिरंगाई व हयगय खपवून घेतली जाणार नाही. सर्व आकडेवारी अचूक पाठवावी. जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी आपल्या अंतर्गत असलेल्या सर्व विधानसभा क्षेत्रातील कामकाजावर लक्ष ठेवावे. पैशांचा वापर, माध्यमांमध्ये येणारी माहिती आणि असामाजिक तत्वांचा वावर याबाबत सजग राहून वेळीच कारवाई करावी.

यांची होती उपस्थिती

बैठकीस नागपूरचे जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर, नांदेड जिल्हाधिकारी अभिजीत  राऊत, परभणी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, बीड जिल्हाधिकारी अविनाश पाठक, लातूर जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे, चंद्रपूर जिल्हाधिकारी  विनय गौडा जी सी, गोंदिया जिल्हाधिकारी प्राजित नायर, भंडारा जिल्हाधिकारी संजय कोलते, वाशिम जिल्हाधिकारी बुवनेश्वरी.एस, वर्धा जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, गडचिरोली जिल्हाधिकारी संजय दैने, हिंगोली जिल्हाधिकारी अभिनव गोयल, धाराशिव जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे, लातूर महानगरपालिका आयुक्त बाबासाहेब मनोहरे, नागपूरचे पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंघल तसेच बीड पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ, बीडचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी महेंद्रकुमार कांबळे, जालना पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, नांदेड पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, धाराशिव पोलीस अधीक्षक संजय जाधव, गोंदिया पोलीस अधीक्षक         गोरख भामरे, चंद्रपूर पोलीस अधीक्षक रिना जानबंधू, लातूर पोलीस अधीक्षक सोमय मुंढे, गडचिरोली पोलीस अधीक्षक नीलोत्पल, परभणी पोलीस अधीक्षक रविंद्रसिंग परदेशी,  हिंगोली पोलीस अधीक्षक एस. डी. कोकाटे, भंडारा पोलीस अधीक्षक नुरुल हसन, वर्धा पोलीस अधीक्षक अनुराग जैन  तसेच दुरदृष्य पद्धतीने  सर्व जिल्ह्यातील अधिकारी व या निवडणूकीसाठी नेमलेले निवडणूक आयोगाचे निरीक्षक सहभागी झाले होते.

बीड जिल्हाधिकारी कार्यालयातून ऑनलाइन उपस्थिती

या बैठकीस बीड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रगती सभागृहातून गेवराई, माजलगावच्या निवडणूक निरीक्षक लालटनपुई वाँगचाँग,  बीड, आष्टीचे निवडणूक निरीक्षक भुवनेश प्रताप सिंग, केज-परळीचे निवडणूक निरीक्षक सुनिल अंचिपका, निवडणूक निरीक्षक (पोलिस) मल्लिका सुरेश,  निवडणूक निरीक्षक (खर्च) कपील जोशी, निवडणूक निरीक्षक के.रोहन राज आणि गेवराई विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी सतीश धुमाळ, माजलगावचे गौरव इंगोले, बीडच्या कविता जाधव, आष्टीच्या वैशाली पाटील, केजचे दीपक वजाळे, परळीचे अरविंद लाटकर ऑनलाइन माध्यमातून उपस्थित होते. तसेच प्रशिक्षणार्थी सहायक जिल्हाधिकारी अर्पिता ठुबे, प्र. अपर जिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके, स्वीपचे नोडल अधिकारी तथा जिल्हा पुरवठा अधिकारी ओमकार देशमुख, अपर पोलिस अधीक्षक सचिन पांडकर, तहसीलदार अविनाश शिंगटे आदींचीही उपस्थिती होती.      

******

Related Articles

आमदार सुनील शेळके फडणवीसांच्या भेटीला!

झुंजार सेनापती l मुंबई  मावळात दणदणीत विजय मिळवून आमदार सुनील शेळके यांनी भारतीय जनता पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मावळ विधानसभेत मिळवलेल्या...

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत झालेल्या मतदानातील अंतिम आकडेवारी जाहीर

झुंजार सेनापती lप्रतिनिधीl मुंबई  महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या 288 मतदारसंघांकरिता दिनांक 20 नोव्हेंबर 2024  रोजी मतदान झाले. या मतदानात एकूण 6 कोटी 40 लाख 88 हजार 195 मतदारांनी आपला सहभाग नोंदविला असून यामध्ये एकूण 3 कोटी 34 लाख 37 हजार 57 पुरूष, 3 कोटी 6 लाख 49 हजार 318 महिला तर 1 हजार 820 इतर मतदारांनी मतदान केले असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.          या निवडणुकीत झालेल्या मतदानाची अंतिम  आकडेवारी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून प्रकाशित झाली आहे. यात प्रत्यक्ष मतदान केलेल्या मतदारांचासमावेश आहे. प्रत्यक्ष मतमोजणी करतांना टपाली मतदानाचा समावेश करण्यात येईल. त्याचप्रमाणे मतदान केंद्राध्यक्षाद्यारे भरण्यात आलेला 17 सी हा प्रत्यक्ष झालेल्या मतदानासंदर्भातील फॉर्म  उमेदवारांच्या प्रतिनिधींनाही देण्यात आला असल्याचेही मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत स्पष्ट करण्यात येत आहे.

ताज्या बातम्या