झुंजार सेनापती l बीड
सध्या कडाक्याचे ऊन आहे. त्यामुळे पाणी भरपूर लागते. अशा परिस्थितीत बावीस दिवसापेक्षा जास्त कालावधीपासून बीड शहरात पाणी नाही. त्यामुळे नगर परिषदेने पाण्याचे योग्य नियोजन लावून नागरिकांना सुविधा उपलब्ध करून द्यावी. सुविधा पुरवणे, हे नगर परिषदेचे काम आहे. त्यात कोणताही उपकार नाही. त्यामुळे पाणी वेळेवर सोडावे. मतदारांनी अशा बाबी लक्षात ठेवाव्यात, असे आवाहन जन आंदोलनाचे विश्वस्त ॲड. अजित एम. देशमुख यांनी केले आहे.
माजलगाव आणि पाली येथून बीडला पाणी येते. माजलगाव कडून येणाऱ्या पाईप लाईनच्या दुरुस्तीमुळे अनेक दिवस पाणी नव्हते. दुरुस्तीचे नियोजन हे अगोदरच करणे आवश्यक होते. मात्र ऐन कडक उन्हाळ्यात पाईप लाईन दुरुस्तीचे काम काढणे चुकीचे आहे.
देखरेख करणे हे सातत्यपूर्ण काम आहे. त्यामुळे कुठला पाईप खराब होत आहे, हे नगर पालिकेला अगोदरच माहीत असणे आवश्यक असते. मात्र नियोजनाचा अभाव असलेल्या बीड नगर परिषदेने जनतेची कुचंबना चालवली आहे. कडक उन्हाळ्यात बावीस दिवसापेक्षा जास्त कालावधीनंतर पाणी मिळत असेल, तर नागरिकांनी पाण्यासाठी कोणते नियोजन करावे, याचे उत्तर देखील नगर पालिकेने दिले पाहिजे.
नगर परिषद हद्दीतील जनता नगर पालिकेला सातत्याने टॅक्स देत असते. जर जनता टॅक्स देत नसेल तर तो वसूल करण्याची जबाबदारी देखील पालिकेची आहे. मात्र या सर्वाकडे कानाडोळा करून नगर पालिका चुकीच्या पद्धतीने चालत असेल, तर दोषींवर कारवाई व्हायला हवी. त्यामुळे नगर पालिकेने नागरिकांना आवश्यक तेवढे पाणी पुरवावे. आठ दिवसाला पाणी सोडावे, असे आवाहन देखील देशमुख यांनी केले आहे.