झुंजार सेनापती l नागपूर
राज्यात जेथे शाळा तेथे शिक्षक या धोरणानुसार सर्व शाळांमध्ये शिक्षक उपलब्ध करून दिले जातील. एकही शाळा शिक्षकाविना राहणार नाही, अशी ग्वाही शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी विधान परिषदेत दिली.
संचमान्यतेमुळे शिक्षकांची कमतरता निर्माण होण्याबाबत सदस्य किरण सरनाईक यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर उत्तर देताना डॉ. भोयर यांनी सांगितले की, १५ मार्च २०२४ च्या शासन निर्णयास उच्च न्यायालयाने वैध ठरवले असून, दुर्गम, डोंगरी किंवा नागरी भाग असा भेद न करता कोणतीही शाळा शिक्षकाविना राहणार नाही, याची शासन दक्षता घेईल.
राज्यात सुरू असलेली विकासकामे आणि सुविधा लक्षात घेता पटसंख्येअभावी शिक्षक न मिळण्याची समस्या उद्भवणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.



