झुंजार सेनापती l नवी दिल्ली
मराठी साहित्य क्षेत्रातील उत्कृष्ट साहित्यनिर्मितीसाठी दिल्या जाणाऱ्या यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार २०२५ साठी राज्य शासनाच्या वतीने लेखक व प्रकाशकांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.
या पुरस्कारासाठी १ जानेवारी ते ३० डिसेंबर २०२५ या कालावधीत प्रकाशित झालेली प्रथम आवृत्तीची पुस्तके पात्र ठरणार आहेत. संबंधित पुस्तके व प्रवेशिका ३० जानेवारी २०२६ पर्यंत महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, रवींद्र नाट्यमंदिर, मुंबई येथे पाठवावीत, असे आवाहन मंडळाच्या सचिवांनी केले आहे.
बृहन्महाराष्ट्रातील लेखकांसाठी स्वतंत्रपणे ‘सरफोजीराजे भोसले बृहन्महाराष्ट्र पुरस्कार’ देण्यात येणार असून उत्कृष्ट साहित्यकृतीस ‘सयाजी महाराज गायकवाड पुरस्कार’ (रक्कम ₹१ लाख) प्रदान करण्यात येईल.
या योजनेअंतर्गत एकूण ४ विभागांत ३५ साहित्य प्रकारांसाठी पुरस्कार दिले जाणार असून प्रौढ वाङ्मय विभागासाठी ₹२२ लाख तर बाल वाङ्मय विभागासाठी ₹३ लाख इतकी पुरस्कार रक्कम निश्चित करण्यात आली आहे. पुरस्कारांच्या नियमावली व प्रवेशिका महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.



