झुंजार सेनापती l सोमनाथ पाटील
मुंबई, दि. २४ : मराठी–अमराठी वाद पुन्हा एकदा पेटलेला असताना भाजपच्या आमदार चित्रा वाघ यांनी ठाकरे कुटुंबावर जोरदार टीका केली आहे. “मराठी माणसाच्या नावावर राजकारण करणाऱ्यांनी आधी स्वतःची भूमिका स्पष्ट करावी. केवळ निवडणुका आल्या की मराठी–अमराठीचा मुद्दा उकरून काढणे म्हणजे जनतेची दिशाभूल आहे,” असा टोला त्यांनी लगावला.
“मुंबई आणि महाराष्ट्र सर्वांना सामावून घेणारा आहे. इथे राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी भाषेचा सन्मान राखायलाच हवा, पण भाषेच्या नावावर समाजात तेढ निर्माण करणं चुकीचं आहे,” असे सांगत त्यांनी ठाकरे बंधूंवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. विकास, रोजगार आणि सुरक्षितता हेच खरे मुद्दे असून भावनिक वादांमधून राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न थांबवावा, अशी स्पष्ट भूमिका चित्रा वाघ यांनी मांडली.



