झुंजार सेनापती l नवी मुंबई | प्रतिनिधी
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (NMIA) आज २५ डिसेंबर २०२५ पासून व्यावसायिक उड्डाणांसाठी खुले होणार असल्याची माहिती सिडकोचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री विजय सिंघल यांनी दिली आहे. पहिल्या टप्प्यात देशांतर्गत विमानसेवा सुरू करण्यात येणार असून दररोज सुमारे 30 उड्डाणे होण्याची शक्यता आहे.
प्रारंभी दिल्ली, गोवा, हैदराबाद, बेंगळुरू यांसारख्या प्रमुख शहरांसाठी उड्डाणे सुरू केली जातील. नवी मुंबई विमानतळ कार्यान्वित झाल्याने छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील प्रवासी ताण लक्षणीयरीत्या कमी होईल, असा विश्वास श्री सिंघल यांनी व्यक्त केला.
अत्याधुनिक टर्मिनल, डिजिटल चेक-इन सुविधा, प्रवासी-अनुकूल सेवा आणि उच्चस्तरीय सुरक्षेची व्यवस्था करण्यात आली आहे. पुढील टप्प्यात आंतरराष्ट्रीय उड्डाणे व कार्गो सेवा सुरू करण्याचे नियोजन असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. नवी मुंबई विमानतळामुळे मुंबई महानगर प्रदेशाच्या आर्थिक व औद्योगिक विकासाला मोठी चालना मिळणार आहे.



