झुंजार सेनापती l मुंबई
महापालिका निवडणुकीच्या मतदानदिवशी शहरात अभूतपूर्व गोंधळ उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले. अनेक मतदान केंद्रांवर ईव्हीएम अचानक बंद पडल्याने मतदारांची मोठी रखडपट्टी झाली. तासन्तास रांगेत उभे राहूनही मतदान न झाल्याने मतदारांमध्ये प्रचंड संताप व्यक्त झाला. काही ठिकाणी मतदानाचा पूर्णपणे हिरमोड झाल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.
याचदरम्यान, काही प्रभागांमध्ये मतदारांच्या बोटावरील शाई पुसल्याच्या तक्रारी, बोगस मतदान, तसेच दुबार मतदानाचे प्रकार समोर आले. मतदानावर प्रभाव टाकण्यासाठी पैसे वाटप सुरू असल्याचे आरोप झाले असून, काही ठिकाणी रोख रक्कम जप्त केल्याची कारवाईही करण्यात आली आहे. या प्रकारांमुळे राजकीय कार्यकर्त्यांमध्ये आमनेसामने येण्याच्या घटना घडल्या, तर काही केंद्रांवर तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले.
सर्व गंभीर आरोप असूनही निवडणूक आयोगाची भूमिका अत्यंत संथ असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. वेळेवर EVM दुरुस्ती, अतिरिक्त यंत्रांची उपलब्धता आणि तक्रारींवर तातडीची कारवाई न झाल्याने आयोगावर टीकेची झोड उठली आहे. नागरिकांचा विश्वास डळमळीत होत असताना, या प्रकरणात आयोग नेमकी कोणती ठोस पावले उचलतो, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.



