झुंजार सेनापती l मुंबई
मतदानावेळी बोटावर लावलेली शाई पुसली जात असल्याच्या कथित प्रकारावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. “देवेंद्र फडणवीस आणि त्यांची चोर कंपनी हरली आहे. हरलेल्या मानसिकतेतूनच जिंकण्यासाठी असे गैरप्रकार केले जात आहेत. ही केवळ शाई पुसण्याची बाब नाही, तर लोकशाहीच पुसली जात आहे,” असा घणाघात त्यांनी केला.
निवडणूक प्रक्रियेदरम्यान मोठ्या प्रमाणावर गोंधळ सुरू असल्याचा आरोप करत उद्धव ठाकरे म्हणाले, “इतका गोंधळ होत असताना निवडणूक आयुक्त आणि त्यांचे कर्मचारी नेमका कशाचा पगार घेत आहेत? जनतेचा फुकटचा पैसा खाऊन सत्ताधाऱ्यांची लाचारी करणाऱ्या अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई झाली पाहिजे.”
निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित करत त्यांनी संबंधित निवडणूक आयुक्तांना तात्काळ निलंबित करून चौकशीची मागणी केली. “लोकशाहीचे रक्षण करणे ही आयोगाची जबाबदारी आहे. मात्र आज आयोग सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली काम करत असल्याचे चित्र दिसत आहे,” असेही त्यांनी नमूद केले.



