⬤ झुंजार सेनापती l नवी दिल्ली
इराणमधील युद्धस्थितीमुळे जगातील कच्चे तेल आणि घरगुती गॅसच्या पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली असताना, भारताने संयुक्त अरब अमिराती सोबत घरगुती गॅस पुरवठ्याबाबत महत्त्वाचा करार केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संयुक्त अरब अमिराती दौऱ्यात हा करार करण्यात आला.
पंतप्रधान मोदी यांनी संयुक्त अरब अमिरातीचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद बिन झाएद अल नाह्यान यांची भेट घेतली. या दौऱ्यात सात महत्त्वाच्या करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. यामध्ये घरगुती गॅस पुरवठा, धोरणात्मक इंधन साठा, संरक्षण सहकार्य, जहाज निर्मिती आणि जहाज दुरुस्ती यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांचा समावेश आहे.
या करारांमुळे देशातील घरगुती गॅस पुरवठा व्यवस्था अधिक मजबूत होण्यास मदत होणार असून ऊर्जा सुरक्षेलाही मोठे बळ मिळण्याची अपेक्षा आहे. तसेच, हॉर्मुझ सामुद्रधुनी खुली आणि सुरक्षित ठेवणे आवश्यक असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी अधोरेखित केले.
पश्चिम आशियात शांतता आणि स्थैर्य राखण्यासाठी भारत सर्व सकारात्मक प्रयत्नांना पाठिंबा देत राहील, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. संयुक्त अरब अमिरातीचा दौरा पूर्ण केल्यानंतर पंतप्रधान मोदी नेदरलँडच्या पुढील दौऱ्यासाठी रवाना झाले.



