spot_img
spot_img

दिंडोशी विशेष न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल पॉक्सो प्रकरणात आरोपीची निर्दोष मुक्तता

ॲड. यमाजी कोकाटे यांचा प्रभावी युक्तिवाद

झुंजार सेनापती l मुंबई
अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर आरोप असलेल्या पॉक्सो प्रकरणात मुंबईतील दिंडोशी विशेष न्यायालयाने आरोपीची निर्दोष मुक्तता करत महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. विशेष पॉक्सो न्यायालयाचे न्यायाधीश एस. एन. सचदेव यांनी उपलब्ध पुरावे आणि साक्षींचा सखोल विचार करून हा निकाल दिला.
प्रकरणानुसार, २०२४ मध्ये पीडित मुलीच्या आईने आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली होती. तक्रारीत आरोपीने अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी पॉक्सो कायद्यांतर्गत तसेच भारतीय दंड संहितेतील संबंधित कलमांनुसार गुन्हा नोंदवून तपास सुरू केला होता.
गेल्या दोन वर्षांपासून न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीदरम्यान सरकारी पक्षाने पीडित मुलगी व तिच्या आईची साक्ष नोंदवली. मात्र, न्यायालयीन प्रक्रियेत दोघींनीही पोलिसांकडे दिलेल्या मूळ तक्रारीतील आरोपांना पाठिंबा दिला नसल्याचे समोर आले. त्यांच्या साक्षींमध्ये तसेच घटनाक्रमाच्या मांडणीत आढळलेल्या विसंगतींमुळे प्रकरणातील आरोपांबाबत गंभीर शंका निर्माण झाल्याचे न्यायालयाने नमूद केले.
न्यायालयाने आपल्या निरीक्षणात स्पष्ट केले की, आरोपीविरुद्धचे आरोप सिद्ध करण्यासाठी आवश्यक असलेली विश्वासार्ह व अखंड पुराव्यांची साखळी तपास यंत्रणेला सादर करता आली नाही. फौजदारी खटल्यात दोषारोप संशयाच्या पलीकडे सिद्ध होणे आवश्यक असते. मात्र या प्रकरणात तो निकष पूर्ण झाला नसल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आले.
सरकारी पक्षाने दोषारोप सिद्ध करण्यासाठी प्रयत्न केले, तर आरोपीची बाजू ॲड. यमाजी कोकाटे यांनी प्रभावीपणे मांडली. त्यांना ॲड. प्रमोद कुंभार यांचे मार्गदर्शन लाभले.
उपलब्ध पुरावे, साक्षीदारांचे जबाब आणि परिस्थितीजन्य बाबींचा विचार करून न्यायालयाने आरोपीविरुद्धचे आरोप संशयाच्या पलीकडे सिद्ध झाले नसल्याचे नमूद करत त्याची निर्दोष मुक्तता केली.
या निकालामुळे न्यायालयीन प्रक्रियेत साक्षीदारांच्या जबाबांतील सातत्य, तपासातील वस्तुनिष्ठता आणि पुराव्यांची भक्कम साखळी किती महत्त्वाची असते, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

Related Articles

गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार शेतकऱ्यांसाठी वरदान

⬤ झुंजार सेनापती l मुंबई : पर्यावरण वाचवणे आणि भूजल पातळी टिकवण्यासाठी पावसाचे पाणी अडवून जमिनीत मुरवणे हीच आजच्या काळातील सर्वात मोठी गरज आहे....

“कार्यालयाला कुलूप, कर्मचारी बेपत्ता! बीड पाटबंधारे विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर”

⬤ झुंजार सेनापती l मुंबई शासकीय कार्यालयांमधील अनागोंदी कारभार आणि जनतेच्या कामांबाबतची उदासीनता पुन्हा एकदा उघड झाली आहे. दैनिक झुंजार सेनापतीचे संपादक सोमनाथ पाटील यांनी...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!