⬤ झुंजार सेनापती l मुंबई
माहिती हे सक्षमीकरणाचे प्रभावी साधन असून, केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती शेवटच्या घटकापर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (एमएसएमई) क्षेत्र हे आर्थिक विकास आणि रोजगारनिर्मितीचे महत्त्वाचे माध्यम आहे. या क्षेत्रातील उद्योजकांना विविध शासकीय योजना, सुविधा आणि संधींची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणारे स्वदेशी शोध संस्थानचे ‘एमएसएस’ ॲप उपयुक्त ठरेल. विशेषतः हे ॲप मराठी भाषेतही उपलब्ध असल्याने राज्यातील उद्योजकांना त्याचा लाभ घेणे अधिक सुलभ होईल, असे प्रतिपादन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी केले.स्वदेशी शोध संस्थानच्या मुंबई चॅप्टरतर्फे विकसित करण्यात आलेल्या ‘एमएसएस’ ॲपचे लोकार्पण राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते लोकभवन येथे करण्यात आले. यावेळी राज्यपालांचे सचिव डॉ.प्रशांत नारनवरे, स्वदेशी शोध संस्थानच्या मुंबई चॅप्टरच्या अध्यक्षा डॉ. आसावरी बापट, प्रमुख डॉ. आर. श्रीनिवासन अय्यंगार, ॲप विकास पथकाचे सदस्य, राजलक्ष्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, चेन्नईचे प्रतिनिधी, स्वदेशी शोध संस्थानचे सदस्य तसेच विविध शैक्षणिक व औद्योगिक क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
स्वदेशी संशोधनातून आत्मनिर्भरतेला चालना मिळेल
एमएसएमई क्षेत्र आर्थिक विकासाबरोबरच मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती करते. कोविडच्या काळात या क्षेत्राला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. त्यामुळे या क्षेत्रातील उद्योजकांच्या पाठीशी उभे राहणे आणि त्यांना आवश्यक माहिती व सुविधा उपलब्ध करून देणे ही आपली जबाबदारी आहे. केवळ नोकरी शोधणारे नव्हे, तर रोजगार निर्माण करणारे उद्योजक घडविण्यासाठी एमएसएमई क्षेत्राचा विस्तार होणे आवश्यक आहे, असे राज्यपालांनी सांगितले.
शिक्षणाप्रमाणेच माहितीमुळेही व्यक्ती आणि समाजाचे सक्षमीकरण होते. केंद्र व राज्य शासनाच्या अनेक योजना असून, त्यांची माहिती सर्वसामान्य उद्योजकांपर्यंत पोहोचविणे हे मोठे आव्हान आहे. या ॲपच्या माध्यमातून विविध योजनांची माहिती स्थानिक भाषेत उपलब्ध होणार असल्याने उद्योजकांना त्याचा लाभ घेता येईल. देशाच्या अर्थव्यवस्थेत महाराष्ट्राचे योगदान मोठे असून, त्यात एमएसएमई क्षेत्राची भूमिकाही महत्त्वपूर्ण आहे. ‘स्वदेशी’च्या विचारातूनच आत्मनिर्भरतेचा मार्ग प्रशस्त होतो. आपल्या देशातील ज्ञान, संसाधने आणि क्षमतांचा उपयोग करून स्वावलंबनाच्या दिशेने वाटचाल करणे आवश्यक असल्याचेही राज्यपालांनी नमूद केले.


