झुंजार सेनापती l मुंबई
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन, मुंबई मेट्रो लाईन-३ च्या अंतिम टप्प्याचे राष्ट्राला समर्पण आणि ‘मुंबई वन’ या देशातील पहिल्या एकात्मिक कॉमन मोबिलिटी अॅपचे लोकार्पण होणार आहे. त्याशिवाय, राज्यातील ४१९ आयटीआय आणि १४१ तांत्रिक संस्थांमध्ये २,५०६ बॅचेसच्या माध्यमातून नवीन अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम या उपक्रमाची सुरुवात प्रधानमंत्री श्री. मोदी यांच्या हस्ते होणार आहे.
नवी मुंबई विमानतळाजवळील प्रांगणात होणाऱ्या या कार्यक्रमास राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री किंजरापु राममोहन नायडू, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, लोकसभा सदस्य श्रीरंग बारणे यांच्यासह लोकप्रतिनिधी व विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ
भारताच्या विमान वाहतूक क्षेत्रात नवे युग सुरू करणारा नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हा देशातील सर्वात मोठा ग्रीनफील्ड विमानतळ प्रकल्प ठरणार आहे. सिडको प्राधिकरण आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेडच्या माध्यमातून हा विमानतळ सार्वजनिक-खासगी भागीदारी (PPP) अंतर्गत उभारण्यात आला आहे. या विमानतळाचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी प्रधानमंत्री मोदी हे विमानतळावरील सोयी सुविधांची पाहणी करणार आहेत.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्यात ₹१९,६४७ कोटींची गुंतवणूक करण्यात आली असून, १,१६० हेक्टर क्षेत्रावर उभारलेला हा विमानतळ दरवर्षी २० दशलक्ष प्रवासी व ०.५ दशलक्ष टन मालवाहतूक हाताळू शकतो. अंतिम टप्प्यात हे विमानतळ ९० दशलक्ष प्रवासी आणि ३.२५ दशलक्ष टन मालवाहतूक क्षमतेचे जागतिक दर्जाचे केंद्र बनेल.
दोन समांतर कोड-एफ रनवे, जलद बाहेर पडण्यासाठी टॅक्सीवे, अत्याधुनिक मालवाहतूक टर्मिनल, सौरऊर्जेवर आधारित ४७ मेगावॅटचा ऊर्जेचा पुरवठा आणि इलेक्ट्रिक बस सेवा ही या विमानतळाची वैशिष्ट्ये आहेत. तसेच, हा देशातील पहिला वॉटर टॅक्सीने जोडलेला विमानतळ असणार आहे.
या विमानतळावरुन डिसेंबर २०२५ मध्ये देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू होणार असून, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे भारताच्या आधुनिक, हरित आणि जागतिक दर्जाच्या विमान वाहतूक पायाभूत सुविधेचे प्रतिक ठरणार आहे.