⬤ झुंजार सेनापती l मुंबई
परिवहन विभागाच्या चौकशीत मे. नवनीत मोटर्सने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी एमएच ०१ एफएम २२११ क्रमांकाचे वाहन नोंदणी होण्यापूर्वीच ग्राहकाच्या ताब्यात दिल्याचे स्पष्ट झाले. या वाहनाचा मोटार वाहन कर १२ ऑक्टोबर रोजी भरला होता, तर अधिकृत नोंदणी १६ ऑक्टोबर रोजी करण्यात आली. नियमानुसार वाहनाची नोंदणी झाल्यानंतरच त्यावर उच्च सुरक्षा नोंदणी पाटी (एचएसआरपी) बसविणे बंधनकारक आहे.
या प्रकरणी ६ नोव्हेंबर २०२६ रोजी संबंधित वितरकाची सुनावणी घेण्यात आली. त्यानंतर नियमांचे उल्लंघन केल्याचे निष्पन्न झाल्याने व्यवसाय प्रमाणपत्र ३० दिवसांसाठी निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आला.
दरम्यान, महाराष्ट्रात वास्तव्यास असलेले काही वाहनधारक राज्याचा मोटार वाहन कर टाळण्यासाठी परराज्यांत वाहनांची नोंदणी करीत असल्याचे परिवहन विभागाच्या निदर्शनास आले आहे. अशा वाहनांची तपासणी करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.
परराज्यात नोंदणी केलेली वाहने महाराष्ट्राच्या रस्त्यांवर वारंवार वापरताना आढळल्यास संबंधित वाहने जप्त करण्याची कारवाई केली जाईल, असा इशारा परिवहन विभागाने दिला आहे. वाहनधारकांनी नियमानुसार आपल्या वाहनांची महाराष्ट्रात नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन सह परिवहन आयुक्त (आयटी) शैलेश कामत यांनी केले आहे.


