झुंजार सेनापती l मुंबई
खाद्यतंत्रज्ञान क्षेत्रातील ज्येष्ठ तज्ज्ञ व पहिल्या पिढीचे यशस्वी उद्योजक डॉ. उमेश मुंजाजी कांबळे यांची असोसिएशन ऑफ फूड सायंटिस्ट्स अँड टेक्नॉलॉजिस्ट्स (इंडिया) – AFSTI च्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड झाली आहे.
AFSTI ही भारतातील खाद्यविज्ञान व खाद्यतंत्रज्ञान क्षेत्रातील सर्वात मोठी व्यावसायिक संस्था असून देशभरात तिचे पाच हजारांहून अधिक सदस्य आहेत. डॉ. कांबळे यांच्या गेल्या दोन दशकांहून अधिक काळातील योगदान, नेतृत्व आणि कार्याची दखल म्हणून ही निवड महत्त्वाची मानली जात आहे.
या निवडीबाबत प्रतिक्रिया देताना डॉ. उमेश कांबळे म्हणाले, “ही मोठी जबाबदारी असून AFSTI च्या प्रभावी व्यासपीठावरून भारतातील खाद्यसुरक्षा व्यवस्था बळकट करणे, एमएसएमई आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणे तसेच शाश्वत कृषी-खाद्य प्रणाली विकसित करणे, हे माझे प्रमुख उद्दिष्ट राहील. विद्यार्थी स्टार्टअप्सना प्रोत्साहन देत अॅग्री-फूड टेक क्षेत्रातील नाविन्य, उद्योग-शिक्षण क्षेत्रातील समन्वय, मेंटरशिप आणि संयुक्त संशोधनाला गती देण्यावर भर दिला जाईल.”
डॉ. कांबळे हे यापूर्वी AFSTI मुंबई चॅप्टरचे अध्यक्ष राहिले असून सध्या ते असोचॅम महाराष्ट्र राज्य विकास परिषदेचे अध्यक्ष आहेत. खाद्यतंत्रज्ञान क्षेत्रातील २१ वर्षांचा अनुभव असलेले डॉ. कांबळे हे F2F Corporate Consultants Pvt. Ltd. चे संस्थापक व मेंटर आहेत. २०२३ मध्ये त्यांना AFSTI–FSSAI राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
डॉ. उमेश कांबळे यांच्या निवडीचे खाद्यप्रक्रिया उद्योग, स्टार्टअप्स तसेच शैक्षणिक क्षेत्रातून उत्स्फूर्त स्वागत होत असून, त्यांच्या नेतृत्वाखाली AFSTI अधिक सक्षम होऊन भारताच्या खाद्यविज्ञान क्षेत्राला नवी दिशा देईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.



