झुंजार सेनापती l प्रतिनिधी
पुणे : चंदननगर परिसरात मानवतेलाच काळिमा फासणारी थरारक घटना उघडकीस आली आहे. पुनम मूण (वय ३५) या बौद्ध महिलेची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, या प्रकरणाने संपूर्ण शहरात संतापाची लाट उसळली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुनम मूण या गेल्या तीन वर्षांपासून एका वकिलाच्या कार्यालयात काम करत होत्या. १६ एप्रिल रोजी कार्यालयातच त्यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. हल्ला इतका भीषण होता की त्यांच्या चेहऱ्यावर तब्बल ५० ते ५६ वार करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. बॅट, कोयता, लोखंडी रॉड यांसारख्या शस्त्रांचा वापर करून अमानुष मारहाण करण्यात आली. दोन्ही हात मोडण्यात आल्याचीही माहिती समोर येत आहे.
या हत्येनंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी तो पोत्यात भरण्याचा प्रयत्न करण्यात आला. इतकेच नव्हे, तर पीडितेच्या पतीची दिशाभूल करण्यासाठी त्याला वेगवेगळ्या ठिकाणी पाठवून गोंधळ उडवण्यात आला. या संपूर्ण प्रकारातून पूर्वनियोजित कटकारस्थानाचा संशय अधिक बळावला आहे.
या घटनेमुळे अनेक गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. पीडितेला काही महत्त्वाची माहिती मिळाली होती का? या हत्येमागे आणखी कोणी सहभागी होते का? १५ व १६ एप्रिल रोजी परिसरातील मोबाईल लोकेशन, सीसीटीव्ही फुटेज यांची सखोल चौकशी करण्याची मागणी दिपक केदार यांनी केली आहे
दरम्यान, आरोपी हा प्रभावशाली वकील असल्याने प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे कोणत्याही दबावाला बळी न पडता निष्पक्ष आणि जलद तपास करण्याची मागणी करण्यात आली आहे.
पीडित पुनम मूण यांच्या पश्चात दोन लहान मुले असून, त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी शासनाने घ्यावी, तसेच कुटुंबाला आर्थिक मदत व संरक्षण द्यावे, अशी मागणी दिपक केदार यांनी केली आहे
या संतापजनक घटनेविरोधात विविध संघटना आक्रमक झाल्या असून, राज्यभर आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. दोषींना तात्काळ अटक करून फास्टट्रॅक न्यायालयात खटला चालवून कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी जोर धरत आहे.



