spot_img
spot_img

वीस वर्षांची प्रतीक्षा संपली; नर्मदेतून महाराष्ट्राला १० टीएमसी पाणी!

मुख्यमंत्री फडणवीसांच्या पुढाकाराला यश

झुंजार सेनापती l नवी दिल्ली 

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या प्रमुख उपस्थितीत  नर्मदा  प्रकल्पाच्या  प्रलंबित प्रश्नांबाबत महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश आणि राजस्थान  या चार राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या महत्वपूर्ण  बैठकीत 20 वर्षापासून प्रलंबित असलेला प्रश्न सुटला असून महाराष्ट्राला दहा टीएमसी पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. या पाण्यापैकी पाच टीएमसी पाणी उकाई धरणातून उचलण्याबाबतही या बैठकीत अनुकूल निर्णय घेण्यात आला.

नवी दिल्ली येथे गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत नर्मदा प्रकल्पाच्या प्रलंबित प्रश्नांबाबत महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश आणि राजस्थान या चारही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची महत्त्वाची बैठक झाली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव, राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांची या बैठकीस उपस्थिती होती.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यम प्रतिनिधींना या बैठकीत झालेल्या महत्त्वपूर्ण निर्णयाची माहिती दिली. नर्मदा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर त्यातून महाराष्ट्राला केवळ वीज मिळाली. मात्र राज्याच्या वाट्याचे 10 टीएमसी पाणी मिळाले नव्हते. त्या दृष्टीने या बैठकीमध्ये महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. राज्यासाठी  देय असलेल्या निधीसह इतरही अनेक प्रलंबित प्रश्नांबाबत सकारात्मक निर्णय झाले. महाराष्ट्राला आता केवळ 27 कोटी  देय असून  उर्वरित देय रक्कम रद्द झालेली आहे. पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावूनही  प्रकल्प पूर्ण झाल्यापासून महाराष्ट्राला थोडेही पाणी मिळाले नव्हते. आजच्या बैठकीत या दृष्टीने महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. महाराष्ट्राच्या हिश्श्याच्या 10 टीएमसी पाण्यापैकी नर्मदा-तापी डायव्हर्जन या स्कीममधून 5टीएमसी आणि  उकाई प्रकल्पातून पाच टीएमसी पाण्याची  मागणी महाराष्ट्राने केली होती. त्याही संदर्भात या बैठकीत अनुकूल निर्णय झाला. पावसाच्या कालावधीत म्हणजे  उकाई धरणात पाणी असतानाच्या काळात हे पाणी उचलण्यास गुजरातने अनुकूलता दर्शवली.  गृहमंत्री अमित शाह आणि जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांनी त्याला मान्यता दिली, अशी माहिती देऊन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केंद्रीय मंत्री श्री. शाह,  श्री पाटील आणि गुजरातच्या मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. उकाई धरणातून पाणी उचलण्याबाबत महाराष्ट्र सरकारकडून  सुव्यवस्थित आराखडा तयार करण्यात येत असून या पाण्याचा उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांना मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Related Articles

ड्रायव्हिंग लायसन्ससाठी १ ऑगस्टपासून अधिवास प्रमाणपत्राची सक्ती

झुंजार सेनापती l मुंबई  राज्यात वाहनचालक परवाना मिळविण्यासाठी १ ऑगस्ट २०२६ पासून नवीन नियमावली लागू करण्यात येणार असून त्यानुसार महाराष्ट्र अधिवास (डोमिसाइल) प्रमाणपत्र अनिवार्य...

१३८ जलदगती न्यायालयांसाठी न्यायाधीश उपलब्धतेचा प्रश्न मार्गी लावणार!

झुंजार सेनापती l मुंबई राज्यात मंजूर करण्यात आलेल्या १३८ जलद गती न्यायालयांपैकी सध्या केवळ ५८ न्यायालये कार्यरत असून उर्वरित न्यायालयांसाठी न्यायाधीश उपलब्ध करून देण्याबाबत...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!