⬤ झुंजार सेनापती l मुंबई
शासकीय कार्यालयांमधील अनागोंदी कारभार आणि जनतेच्या कामांबाबतची उदासीनता पुन्हा एकदा उघड झाली आहे. दैनिक झुंजार सेनापतीचे संपादक सोमनाथ पाटील यांनी केलेल्या थेट स्टिंग ऑपरेशनमध्ये बीड पाटबंधारे विभागातील धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
माहितीनुसार, एका प्रकल्पातील पाणीपातळीची माहिती मिळवण्यासाठी कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग, बीड यांना सहा दिवसांपूर्वी लेखी पत्र देण्यात आले होते. मात्र या पत्रावर कोणतीही कार्यवाही करण्यात आली नसून ते आवक-जावक विभागात धूळ खात पडून असल्याचे निदर्शनास आले.
याबाबत माहिती घेण्यासाठी संपादक सोमनाथ पाटील यांनी प्रत्यक्ष कार्यालयात भेट दिली असता कर्मचाऱ्यांकडून समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत. उलट दिशाभूल करणारी माहिती देऊन प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचे आढळून आले.
यानंतर करण्यात आलेल्या थेट लाईव्ह स्टिंग ऑपरेशनमध्ये शासकीय वेळेत अनेक कर्मचारी कार्यालयात अनुपस्थित असल्याचे समोर आले. धक्कादायक बाब म्हणजे, ‘मुव्हमेंट रजिस्टर’मध्ये कोणतीही नोंद न करता कर्मचारी कार्यालयाबाहेर गेल्याचा आरोप करण्यात आला आहे. काही कर्मचाऱ्यांनी तर शासकीय कार्यालयाला कुलूप ठोकून खासगी कामांसाठी बाहेर पडल्याचेही स्टिंग ऑपरेशनमध्ये उघड झाले.
विशेष म्हणजे, कार्यालयात उपस्थित असलेल्या काही कर्मचाऱ्यांनी गैरहजर कर्मचाऱ्यांची बाजू घेत त्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केल्याचेही लाईव्हमध्ये दिसून आले. त्यामुळे विभागातील शिस्त, जबाबदारी आणि पारदर्शकतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
जनतेच्या करातून लाखो रुपयांचे वेतन घेणारे अधिकारी आणि कर्मचारी जर कार्यालयीन वेळेत कार्यालयातच उपलब्ध नसतील, तर सामान्य नागरिकांची कामे कशी होणार, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
मुख्य अभियंत्यांचे चौकशीचे आश्वासन
या संदर्भात मुख्य अभियंता सुरेंद्र पवार यांच्याशी संपर्क साधला असता ते सध्या दोन दिवसांसाठी मुंबई दौऱ्यावर असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
संपादक सोमनाथ पाटील यांची मागणी
बीड पाटबंधारे विभागातील या प्रकाराची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ सखोल चौकशी करून दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर प्रशासकीय कारवाई करावी. तसेच शासकीय कार्यालयांमध्ये जनतेची कामे वेळेत, पारदर्शक आणि जबाबदारीने व्हावीत यासाठी उत्तरदायित्व निश्चित करावे, अशी मागणी दैनिक झुंजार सेनापतीचे संपादक सोमनाथ पाटील यांनी केली आहे.
बीड पाटबंधारे विभागातील या धक्कादायक प्रकारामुळे प्रशासनातील ढिसाळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असून, आता वरिष्ठ अधिकारी नेमकी कोणती कारवाई करतात याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.



