⬤ झुंजार सेनापती l मुंबई
छत्रपती संभाजीनगर विभागातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि परभणी जिल्ह्यांतील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयात शासकीय अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक पार पडली.

बैठकीत तालुकानिहाय तलाव व जलाशयांची संख्या, कोरडे पडलेले तलाव, गतवर्षीच्या तुलनेत यंदाचे पर्जन्यमान तसेच ‘ट्रिगर-१’ अंतर्गत अवर्षण परिस्थितीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. दुष्काळी परिस्थितीचा मत्स्यव्यवसायावर होणारा परिणाम आणि मच्छीमारांसमोर निर्माण झालेल्या अडचणींवरही चर्चा करण्यात आली.
दुष्काळामुळे मच्छीमारांच्या व्यवसायावर परिणाम होत असल्याने बँकांनी मत्स्यव्यवसायाशी संबंधित प्रस्ताव स्वीकारून त्यांना आवश्यक सहकार्य करावे, अशा सूचना मंत्री राणे यांनी दिल्या. तसेच तलावांमधील गाळ काढण्याची कामे संबंधित विभागांनी समन्वयाने मार्गी लावावीत, असेही निर्देश देण्यात आले.
मत्स्यव्यवसाय, पाटबंधारे आणि जलसंधारण विभागांनी परस्पर समन्वयातून काम करून मच्छीमारांना आवश्यक ती मदत उपलब्ध करून द्यावी, असे निर्देशही यावेळी देण्यात आले.
दरम्यान, दुष्काळामुळे जलसाठ्यांमध्ये घट होत असल्याने मत्स्यव्यवसायावर होणाऱ्या परिणामाचा वस्तुनिष्ठ आढावा घेऊन अहवाल सादर करण्याचे निर्देश यापूर्वीही मंत्री राणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.
बैठकीस मत्स्य आयुक्त भानुदास पालवे, सहाय्यक आयुक्त (भूजल) ऋता दीक्षित, प्रादेशिक आयुक्त छत्रपती संभाजीनगर सुरेश भारती यांच्यासह मत्स्यव्यवसाय, पाटबंधारे, जलसंधारण विभाग तसेच विविध बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.



