झुंजार सेनापती l बीड
बीड तालुक्यातील तांदळवाडी घाट येथील ग्रामपंचायत कार्यालयामध्ये ९ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आलेली विशेष ग्रामसभा सत्ताधाऱ्यांचा सावळागोंधळ, ग्रामसेवकाची मुजोरी आणि बोगस कारभारामुळे वादळी ठरली. दुष्काळ निवारण उपाययोजना व मृद आणि जलसंधारणाच्या कामांचा आराखडा तयार करण्यासाठी सरपंचांनी स्वतः सोशल मीडियावर आवाहन करून सकाळी ९ वाजता ही सभा बोलावली होती. मात्र, ऐन वेळेला ग्रामसभेला शासकीय नियमांचे उल्लंघन करत ग्रामसेवक लांडगे आणि उपसरपंच हे दोघेही गैरहजर राहिल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.
कोऱ्या प्रोसिडिंग बुकवर सह्या घेण्याचा प्रताप
या ग्रामसभेला गावातील जागरूक मतदार तथा पत्रकार (संपादक) पहिल्यांदाच उपस्थित राहिले होते. सभा सुरू झाली तरी ग्रामसेवक हजर नव्हते. धक्कादायक बाब म्हणजे, सरपंच कोणत्याही प्रकारचा ठराव वा चर्चा न करता, ग्रामस्थांच्या आधीच सह्या घेतलेले कोरे प्रोसिडिंग (इतिवृत्तांत) बुक घेऊन सभेत आले होते. या कोऱ्या पुस्तकाचा वापर करून पुढे लाखो रुपयांचे बोगस ठराव मंजूर करण्याचा डाव असल्याचा संशय ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. ग्रामसेवकांशी फोनवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी फोन स्वीकारण्याचे टाळले.
राष्ट्रीय ध्वजारोहणाला ग्रामसेवकाची कायम दांडी
ग्रामसेवक लांडगे हे गावात रुजू झाल्यापासून २६ जानेवारी (प्रजासत्ताक दिन), १ मे (महाराष्ट्र दिन), १५ ऑगस्ट (स्वातंत्र्य दिन) आणि १७ सप्टेंबर (मराठवाडा मुक्ती संग्राम दिन) या एकाही राष्ट्रीय सणाला ध्वजारोहणासाठी उपस्थित राहिलेले नाहीत. शासकीय नियमांनुसार हा राष्ट्रध्वजाचा अवमान मानला जातो. असे असूनही सरपंच आणि उपसरपंच यांनी त्यांच्याविरुद्ध आजपर्यंत साधा ठराव किंवा कोणतीही प्रशासकीय कारवाई केली नाही. लोकप्रतिनिधी आणि लाचखोर ग्रामसेवकाच्या या युतीमुळे गावाचा विकास खुंटला असून मतदारांची मोठी फसवणूक होत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.
बोगस कामांचे पुरावे संपादकांकडे सुरक्षित
काही दिवसांपूर्वी (१७ सप्टेंबर रोजी) गावातील दलित वस्तीतील पिण्याच्या पाण्याच्या गंभीर समस्येबाबतचा एक व्हिडिओ सोशल मीडिया ग्रुपवर पोस्ट करण्यात आला होता. यानंतर गावातील बोगस कामांचे पितळ उघडे पडल्याने सत्ताधारी गटात अस्वस्थता पसरली आहे. गावातील विविध बोगस कामांच्या तक्रारी सध्या पंचायत समिती स्तरावर प्रलंबित आहेत. धक्कादायक म्हणजे, काही बोगस बिले ही केवळ राजकीय दबावापोटी मंजूर करण्यात आल्याची कबुली स्वतः ग्रामसेवकाने फोनवर दिली असून, या संभाषणाचा ऑडिओ पुरावा पत्रकार तथा संपादकांकडे सुरक्षित आहे.
पुनर्वसित गावातील प्लॉट आणि रहिवाशांच्या पीटीआर (PTR) बाबत, तसेच पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नावर उत्तर देण्यास ग्रामसेवक नेहमीच पळ काढतात. निवडणुका जिंकण्यासाठी हेच सरपंच आणि उपसरपंच एकाच पॅनलमधून गावकऱ्यांकडे ४ ते ५ वेळा हात जोडून मते मागायला आले होते. मात्र, आज मूलभूत सुविधा मागणाऱ्या ग्रामस्थांवर आणि पत्रकारांवर सत्ताधाऱ्यांचे काही कार्यकर्ते हुसकावून लावण्यासाठी थेट अंगावर येण्याचे धाडस दाखवत आहेत.
या संपूर्ण भ्रष्टाचाराविरोधात आणि प्रशासकीय अनागोंदीविरोधात आता वरिष्ठ पातळीवर आणि पंचायत समिती स्तरावर पुराव्यासह तक्रार दाखल केली जाणार असून, या मनमानी कारभाराविरोधात न्यायालयीन लढाई लढण्याचा इशारा तांदळवाडी घाट येथील सुजाण नागरिकांनी व पत्रकारांनी दिला आहे.



